Home Breaking News शेफाली जरीवालाचे वयाच्या 42व्या वर्षी आकस्मिक निधन; हृदयविकाराच्या झटक्याने घेतला अखेरचा श्वास...

शेफाली जरीवालाचे वयाच्या 42व्या वर्षी आकस्मिक निधन; हृदयविकाराच्या झटक्याने घेतला अखेरचा श्वास – भावपूर्ण श्रद्धांजली!

63
0
मुंबई: मनोरंजन विश्वाला हादरवून टाकणारी एक मोठी आणि दु:खद बातमी समोर आली आहे. ‘काँटा लगा’ या सुपरहिट म्युझिक व्हिडिओमुळे घराघरात ओळख निर्माण करणारी अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी आकस्मिक निधन झाले आहे. 27 जूनच्या रात्री हृदयविकाराचा तीव्र झटका (कार्डियाक अरेस्ट) आल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तिला तातडीने मुंबईतील बेलव्यू मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी तिच्यासोबत तिचा पती पराग त्यागी आणि इतर तीन व्यक्ती उपस्थित होते. मात्र, हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट आणि डॉक्टरांनी देखील या घटनेला दुजोरा दिला असून, अभिनेत्रीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. डॉ. विजय लुल्ला, जे हृदयरोगतज्ज्ञ आहेत, त्यांनी या प्रकरणावर अधिक माहिती देण्यास नकार दिला, परंतु मृत्यूची बातमी फेटाळली नाही.
या दु:खद घटनेने संपूर्ण मनोरंजन क्षेत्र शोकमग्न झाले असून, सोशल मीडियावर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे. राजीव अदातिया, अली गोनी यांच्यासह अनेक कलाकारांनी तिच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
2002 मध्ये ‘काँटा लगा’ या रिक्रिएटेड गाण्यामुळे शेफालीने अल्पावधीत लोकप्रियतेचे शिखर गाठले. तिच्या खास लूक, अभिनयशैली आणि आत्मविश्वासामुळे ती ‘काँटा लगा गर्ल’ म्हणून ओळखली जाऊ लागली. टी-सीरीजने रिलीज केलेल्या या म्युझिक व्हिडिओने तरुणाईमध्ये विशेष लोकप्रियता मिळवली होती.
त्यानंतर तिने ‘बिग बॉस 13’मध्येही सहभाग घेतला होता आणि तिचा प्रामाणिक स्वभाव, स्पष्टवक्तेपणा यामुळे प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले.
 वैयक्तिक जीवन
शेफाली जरीवालाचा जन्म 15 डिसेंबर 1982 रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे झाला होता. तिचे वडील सतीश जरीवाला आणि आई सुनीता जरीवाला यांनी तिच्या करिअरला पाठिंबा दिला. 2014 साली तिने टीव्ही अभिनेता पराग त्यागी याच्याशी विवाह केला होता. त्यांच्या जोडीला अनेक चाहत्यांचे प्रेम लाभले होते.
शेफालीचे असे अचानक जाणे हे तिच्या कुटुंबीयांसाठी, चाहत्यांसाठी आणि मनोरंजन सृष्टीसाठी मोठा आघात आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली…!
अनेक कलाकार, चाहते, मित्रमंडळी तिच्या आठवणींना उजाळा देत आहेत. तिचा निखळ हास्य, सौंदर्य आणि आत्मविश्वास कायम लक्षात राहणार आहे.