Home Breaking News तळेगाव एमआयडीसीतील उद्योजकांच्या अडचणी समजून घेतल्या पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे – औद्योगिक...

तळेगाव एमआयडीसीतील उद्योजकांच्या अडचणी समजून घेतल्या पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे – औद्योगिक प्रश्नांवर उपाययोजना सुरू

53
0
तळेगाव दाभाडे एमआयडीसी हद्दीतील विविध औद्योगिक कंपन्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी थेट संवाद साधत उपाययोजनांची ग्वाही दिली. जेसीबी कंपनीच्या मिटींग हॉलमध्ये आयोजित या आढावा बैठकीत तब्बल ५० ते ६० कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. ही बैठक गुरुवार, २६ जून रोजी पार पडली.
बैठकीची सुरुवात पोलिस उपायुक्त (परिमंडल २) विशाल गायकवाड यांच्या प्रस्तावनेने झाली. यानंतर पोलिस आयुक्त चौबे यांनी उद्योजकांच्या समस्या समजून घेतल्या. चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेले प्रश्न म्हणजे –
नवलाख उंबरे व जाधववाडी रस्त्यावरील वाहतूककोंडी, जमीन अधिग्रहण प्रक्रियेतील अडथळे, रस्त्यांची दुरवस्था व अपघातांची वाढती संख्या, या मुद्द्यांवर वाहतूक विभाग, एमआयडीसी व महावितरण अधिकाऱ्यांनी उपाययोजनांची माहिती दिली.
पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले की, औद्योगिक तक्रारी निवारणासाठी इंडस्ट्रियल ग्रिव्हियन्स सेल स्थापन करण्यात आलेला आहे, जे उद्योगसमुहांसाठी एक मोठा दिलासा आहे. कंपन्यांनी आपल्या कॅम्पसच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करावी, तसेच कामगारांसाठी हेल्मेट वापर सक्तीने लागू करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
बैठकीनंतर चौबे यांनी ‘हुंदाई कंपनी’ला भेट देत पॅन्ट हेड शाम सिंग यांच्याशी संवाद साधला, आणि कंपनीतील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत निरीक्षण करून महत्त्वाच्या सूचना दिल्या.
या बैठकीस औद्योगिक सेलचे सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल हिरे, महावितरणचे उपअभियंता जयप्रकाश सागरे, एमआयडीसीचे सहाय्यक अभियंता राजेश धोत्रे, तसेच पोलीस निरीक्षक रणजित जाधव, दिगंबर सूर्यवंशी, गणेश लोंढे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 अशा प्रकारे औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करत प्रशासन व पोलिस यंत्रणा उद्योजकांशी संवाद साधत असून, औद्योगिक विकासाला गती देण्याचा प्रयत्न होत आहे.