लोणावळा | २१ जून २०२५ :- ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयाच्या “एक पेड माँ के नाम” या प्रेरणादायी उपक्रमांतर्गत केवळ योगाभ्यास नव्हे, तर हरित क्रांतीसाठी “हरित योग उत्सव” केवळाधाम योग संस्था आणि केवळ विद्यापीठ निपटण शाळेत मोठ्या उत्साहात साजरा झाला.
कार्यक्रमास सकाळी ११ वाजता प्रारंभ झाला. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन शिक्षिका सोनाली जाधव यांनी केले. वरिष्ठ योग शिक्षक नीरेज सिंग यांनी अतिथींना स्वागत करून योगाचे महत्त्व विशद केले. शिक्षक इंद्रा पुरोहित यांच्या सहभागाने कार्यक्रमात वैचारिक सखोलता आली. विद्यार्थ्यांनी “एक पेड माँ के नाम” संकल्पाचे महत्त्व विविध कविता आणि भाषणांमधून मांडले.
वृक्षारोपणाचा नवा संकल्प: या उपक्रमात 550 हून अधिक विद्यार्थी, शिक्षक, पालक, केवळाधामचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी एकत्र येत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले. वनपरिमंडळ अधिकारी सागर चुटके यांचे सहकार्य विशेष उल्लेखनीय ठरले. केवळाधाम योग संस्थेचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी मुकेश तिवारी यांनी आयुष मंत्रालयाच्या संकल्पामागची भावना समजावून सांगितली.
वृक्षारोपणासाठी संस्थेच्या आवारातच विशेष जागा निश्चित करून वृक्षांची नावे मातांच्या नावावर ठेवण्यात आली – ज्यामुळे या मोहिमेला भावनिक आणि सामाजिक अधिष्ठान लाभले.
कार्यक्रमाचा समारोप: कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी आपल्या लेखी संकल्प सादर करत वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचे वचन दिले.
“एक पेड माँ के नाम” – एक योग, एक प्रार्थना, एक वचन! योग हे केवळ शरीरसंपादनाचे माध्यम नाही तर पर्यावरणपूरक जीवनाचा एक शाश्वत मार्ग आहे, याचा आदर्श लोणावळ्यातील या उपक्रमातून समोर आला.