Home Breaking News दुबईच्या विकासात मोलाचा वाटा उचलणाऱ्या ‘दुबईमित्र’ सोमनाथ पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार

दुबईच्या विकासात मोलाचा वाटा उचलणाऱ्या ‘दुबईमित्र’ सोमनाथ पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार

102
0
प्रतिनिधी: श्रावणी कामत | पिंपरी, पुणे (दि. ९ जून २०२५)
दुबई या वाळवंटातील छोट्या खेड्याचे जगभरात प्रसिद्ध समृद्ध शहरात रूपांतर होताना अनेक भारतीयांनी आपला मोलाचा सहभाग दिला आहे. याच द्रष्ट्या, कार्यसमर्थ आणि कृतिशील व्यक्तींमध्ये मराठी समाजाचा अभिमान असलेले सोमनाथ पाटील यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांच्याच गौरवासाठी रविवारी (दि. ८ जून) पुण्यात एक भव्य आणि हृदयस्पर्शी सत्कार सोहळा पार पडला.
या सत्काराच्या निमित्ताने दुबई आणि संयुक्त अरब अमिरातीतील त्यांच्या दीर्घकालीन कार्यावर आधारित एक प्रेरणादायी पुस्तक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रत्येकजणाने सोमनाथ पाटील यांच्या कार्याची आणि सामाजिक योगदानाची मुक्तकंठाने स्तुती केली.
सोमनाथ पाटील हे गेली ३७ वर्षे दुबई सरकारमध्ये उच्चपदावर कार्यरत होते. दुबईच्या जल व वीज विभागात व्यवस्थापक व प्रकल्प सल्लागार म्हणून त्यांनी विविध प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले. त्यांच्या या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना संयुक्त अरब अमिरातीचे उपाध्यक्ष आणि पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांच्या हस्ते खास सन्मान प्रदान करण्यात आला होता.
या गौरव सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या चित्रपट दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार तज्ज्ञ विद्याधर अनास्कर होते. पुण्यभूषण फाउंडेशनचे डॉ. सतीश देसाई, संवाद संस्थेचे सुनील महाजन, पीसीईटीचे डॉ. गिरीश देसाई, उद्योजक कल्याण तावरे, समीर लडकत, ब्रिगेडियर किशोर जाधव, डॉ. शहाजी चव्हाण, डॉ. सतीश जगताप, डॉ. पी. डी. पाटील, अशोक विखे पाटील, शिवाजीराव कदम यांसारखे मान्यवर उपस्थित होते.
सोमनाथ पाटील यांच्या पत्नी शालन पाटील यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आकर्षण ठरले ते जितेंद्र भुरुक यांचे विशेष गीत सादरीकरण. या समारंभात पाटील यांचे जुने सहकारी, मित्रपरिवार, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाटील यांनी आपल्या मनोगतातून दुबईतील संघर्षमय आणि प्रेरणादायी वाटचालीचा आढावा घेतला. लहानपणापासून क्रिकेटप्रेमामुळे दुसऱ्याच्या घरी टीव्ही बघणाऱ्या या छोट्या गावातील मुलाने पुढे जाऊन शारजाह क्रिकेट मैदानाच्या उभारणीत सहभाग घेतल्याचा उल्लेख करताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना गहिवरून सांगितले. क्रिकेट विश्वातील दिग्गजांशी जुळलेली मैत्री आणि सिरीज मॅनेजमेंट टीमचा भाग होण्याचा अनुभव त्यांनी रसिकांसोबत शेअर केला.
हा कार्यक्रम केवळ सत्काराचा नव्हता, तर एका मराठी माणसाच्या प्रेरणादायी प्रवासाचे, जिद्दीचे आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचे स्मरण होते. आजही दुबईतील मराठीजनांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे ‘दुबईमित्र’ म्हणून सोमनाथ पाटील हे नाव आदराने घेतले जाते.