Home Breaking News ठाकर वस्तीच्या विकासाचा नवा अध्याय; आमदार शेळके यांच्या सूचनेनंतर तहसीलदार व बीडीओंची...

ठाकर वस्तीच्या विकासाचा नवा अध्याय; आमदार शेळके यांच्या सूचनेनंतर तहसीलदार व बीडीओंची ऐतिहासिक भेट

82
0

प्रतिनिधी – श्रावणी कामत | तळेगाव दाभाडे | २९ मे : तळेगाव दाभाडे शहर व सोमाटणे ग्रामपंचायत यांच्या सीमारेषेवर वसलेली ठाकर वस्ती ही अनेक वर्षे प्रशासनाच्या दुर्लक्षाचा बळी ठरली होती. ना शहरात, ना गावात समावेश – त्यामुळे त्रिशंकू स्थिती निर्माण झालेली. मात्र, मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सक्रिय पाठपुराव्यानंतर अखेर प्रशासनाची नजर या भागाकडे वळली असून, तहसीलदार विक्रम देशमुख आणि गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांनी ठाकर वस्तीला पहिलीच भेट देत नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकल्या.

प्रत्यक्ष भेट, थेट संवाद – विकासाची पहिली पायरी!

यावेळी नागरिकांनी पाण्याचा अभाव, रस्त्यांची दुरवस्था, ओळखपत्रांचे अभाव, शिक्षण व आरोग्य सुविधा अशा मूलभूत प्रश्नांची कैफियत मांडली. अधिकाऱ्यांनी घरकुल योजना, संजय गांधी निराधार योजना, रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र, आरोग्य शिबिर, शिक्षण व स्वयंरोजगार योजनांविषयी मार्गदर्शन करत त्यांच्या अडचणींचा आढावा घेतला.

 “शासनाच्या योजना वस्तीपर्यंत पोहचणार!”

“ठाकर वस्तीवरील लोकांना आजवर अनेक योजनांपासून वंचित राहावं लागलं. पण आता आम्ही आरोग्य शिबिर, संजय गांधी योजना कॅम्प, जात प्रमाणपत्र शिबिर आदी उपक्रम हाती घेणार आहोत. शासनाच्या योजना प्रत्यक्षात राबवण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा,” असे आवाहन तहसीलदार विक्रम देशमुख यांनी यावेळी केलं.

 दौऱ्यावेळी उपस्थित मान्यवर:

ग्रामसेवक खोमणे, आमदार कार्यालयाचे प्रतिनिधी सचिन वामन, शाम शेळके, अनिल जाधव, अशोक गावडे, अश्विन केदारी, राहुल जाधव, सुरेश केदारी, राजू गावडे यांच्यासह स्थानिक महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण दौरा शांततेत, सकारात्मक वातावरणात पार पडला.

 “हा दौरा केवळ भेट नव्हे, तर वस्तीच्या विकासाचा शुभारंभ!”

ठाकर वस्तीतील नागरिकांना प्रशासनाशी थेट संवाद साधण्याची ही पहिलीच संधी मिळाली. त्यामुळे अनेक वर्षांचे मौन आणि तक्रारी आता कृतीच्या दिशेने वळल्या आहेत. हा दौरा फक्त एक कार्यक्रम नव्हे, तर भविष्यातील विकासाची सुरुवात मानली जात आहे.