नाशिक जिल्ह्यातील येवला येथील माजी आमदार नरेंद्र दराडे, मुंबई महानगरपालिकेतील उबाठा गटाचे माजी नगरसेवक गणेश सानप, त्यांच्या पत्नी व माजी नगरसेविका सौ. सुजाता सानप, तसेच माजी नगरसेविका सौ. राजराजेश्वरी रेडकर यांनी काल मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश करताना सर्व नेत्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले व त्यांच्या सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रवेशामुळे शिवसेनेला मुंबई व नाशिक या दोन प्रमुख जिल्ह्यांमध्ये मोठा राजकीय बळकटीचा आधार मिळाला आहे. विशेषतः उबाठा गटातील अनेक महिला नगरसेविका, ज्येष्ठ कार्यकर्त्या आणि माजी पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेतील आगामी निवडणुकीत शिवसेनेला बळकटी मिळणार हे निश्चित मानले जात आहे.
गेल्या दोन ते अडीच वर्षांमध्ये शिवसेनेने मुंबईतील रस्त्यांची मजबुती, शहराची सजावट, डीप क्लीन ड्राइव्ह आणि आरोग्य सेवा यामध्ये भरीव कामगिरी केली आहे. हाच विकासनिधी नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना सज्ज झाली आहे. नागरिकांनी जसे विधानसभेत भरभरून पाठिंबा दिला, तसाच पाठिंबा महानगरपालिकेच्या निवडणुकीतही मिळेल, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला.
राज्यातील महायुती सरकारने नाशिक जिल्ह्यातील अनेक प्रलंबित प्रकल्पांना गती दिली आहे. शिक्षकांच्या प्रश्नांवर प्राधान्याने निर्णय घेण्यात आला असून जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात सन्मानपूर्वक तोडगा काढण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी यावेळी सांगितले की, त्यांना शिक्षकांचा भरघोस पाठिंबा आणि आशीर्वाद मिळत आहे.
या कार्यक्रमात आमदार किशोर दराडे यांची ‘शिवसेना प्रणीत शिक्षक सेने’च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे उपनेते व नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, महिला नेत्या मीनाताई कांबळी, सचिव राम रेपाळे, सुशांत शेलार, वैभव थोरात, माजी नगरसेविका सुवर्णा करंजे, तसेच मुंबई व नाशिक जिल्ह्यांतील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रवेशाने शिवसेनेच्या संघटनात्मक बळात लक्षणीय वाढ झाली असून, आगामी निवडणुकांमध्ये भगवा झेंडा मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा फडकेल, असा आत्मविश्वास नेत्यांनी व्यक्त केला.