पुणे | २१ मे २०२५ :- मंगळवारी पुणे शहरावर पावसाने अक्षरशः कहर केला. दिवसभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहरात पाणी साचले असून, वाहनचालकांना तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले. हिंजवडी, सिंहगड रोड, वारजे, सातारा रोड या प्रमुख भागांमध्ये वाहतूक ठप्प झाली होती. विशेषतः नव्याने उघडलेल्या सिंहगड रोड फ्लायओव्हरवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

पावसाची ठिकाणनिहाय नोंद:
मंगळवारी IMD ने नोंदवलेले पावसाचे प्रमाण:
हडपसर: 76 मिमी
दुडुळगाव: 70.5 मिमी
वडगावशेरी: 67 मिमी
NDA: 65.5 मिमी
लोणावळा: 56.5 मिमी
पाषाण: 54 मिमी
हवेली, लवासा: 49 मिमी
तळेगाव: 44 मिमी
गिरिवन: 42 मिमी
शिवाजीनगर: 40.5 मिमी
लवळे: 35.5 मिमी राजगुरुनगर: 29 मिमी
कोरेगाव पार्क, नगर रोड: 28 मिमी
पुरंदर: 17.5 मिमी
निंबगिरी: 12.5 मिमी
भोर, बल्लाळवाडी: 6 मिमी
हवामान खात्याचा अलर्ट
भारतीय हवामान विभागाने पुण्यासह रायगड आणि नाशिकसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामध्ये विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस आणि ढगफुटीसदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यातील घाटमाथ्यांवर – विशेषतः मुळशी, सिंहगड, टेमघर, खंडाळा व सातारा भागात येत्या ४–५ दिवसांत मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान तज्ञांचा अंदाज
हवामानतज्ज्ञ विनीत कुमार यांनी सांगितले की, आज सकाळपर्यंत पाऊस अपेक्षित नाही. दुपारी २:३० नंतर विजांच्या कडकडाटासह हलक्याफुलक्या पावसाची शक्यता आहे. कालच्या तुलनेत आज पावसाचा जोर कमी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोणत्या भागात काय परिस्थिती?
औंध, बाणेर, बालेवाडी, वाकड आणि हिंजवडी – दुपारी उशिरा विजांसह पावसाची शक्यता
डेक्कन, कोथरूड आणि शिवाजीनगर – संध्याकाळी पावसाची शक्यता, पण कालच्या तुलनेत सौम्य
नागरिकांनी घ्यावयाची काळजी:
-
आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नका
-
गाडी चालवताना विशेष दक्षता घ्या
-
पाणी साचलेल्या भागांपासून दूर रहा
-
प्रशासनाच्या सूचना वेळोवेळी तपासा