Home Breaking News पिंपरी-चिंचवडमध्ये बीआरटीएस सेवा ठरत आहे सार्वजनिक वाहतुकीचा कणा; दररोज २.४५ लाखांहून अधिक...

पिंपरी-चिंचवडमध्ये बीआरटीएस सेवा ठरत आहे सार्वजनिक वाहतुकीचा कणा; दररोज २.४५ लाखांहून अधिक प्रवाशांचा विश्वास

83
0

पिंपरी-चिंचवड | शहराचा वेगाने होणारा विस्तार, वाढती लोकसंख्या आणि खाजगी वाहनांच्या संख्येत होणारी वाढ यामुळे सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी असणे अत्यावश्यक बनले आहे. अशा परिस्थितीत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (BRTS) ही सेवा शहरवासीयांसाठी एक मोठा दिलासा बनली आहे. आज सुमारे २ लाख ४५ हजार प्रवासी दररोज बीआरटीएस सेवा वापरत आहेत, जी एकूण पीएमपीएमएल प्रवाशांच्या जवळपास २२ टक्के इतकी आहे.

शहराच्या चारही दिशांना BRTS सेवा

BRTS कॉरिडॉर हे शहराच्या पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण भागातील प्रमुख मार्गांना जोडणारे आहेत. निगडी–दापोडी, दिघी–आळंदी, सांगवी–किवळे, काळेवाडी–चिखली आणि नाशिकफाटा–वाकड हे ५ प्रमुख बीआरटीएस कॉरिडॉर सध्या कार्यरत असून, यामुळे १११ मार्गांवर थेट संपर्क साधला जातो.

शहरातील सुमारे ९६ टक्के लोकसंख्या बस थांब्याच्या ५०० मीटर अंतरात राहत असल्याने, ही सेवा सहज उपलब्ध आहे. स्वतंत्र मार्गिका व गर्दीच्या वेळात कमी वेळात येणाऱ्या बसमुळे प्रवासाचा कालावधी लक्षणीय घटतो. यामुळे नागरिक बीआरटीएसला प्राधान्य देत आहेत.

वाहतूक व्यवस्थेचा बदल घडवणारी सेवा

BRTS सेवा ही केवळ प्रवाशांची गरज पूर्ण करणारी नाही, तर ती वाहतूक कोंडी कमी करणारी, पर्यावरणपूरक आणि स्वस्त अशी सेवा बनली आहे. BRTS साठी वापरली जाणारी रस्त्याची जागा तुलनेने कमी असून, तितक्या जागेत जास्त प्रवासी वाहून नेले जात असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

उदाहरणार्थ, निगडी–दापोडी मार्गावर BRTS फक्त १५% रस्त्याचा वापर करून दरतास ५,६०० प्रवाशांना सेवा देते, तर उर्वरित ५२% जागेत केवळ ७,२०० प्रवासीच वाहून नेले जातात. यावरून BRTS सेवा ही अत्यंत कार्यक्षम आणि जागेचा प्रभावी वापर करणारी प्रणाली आहे हे दिसते.

वाढत्या मागणीला उत्तर देण्यासाठी वाहतूक सेवा वाढणार

पिंपरी-चिंचवड महापालिकेने सार्वजनिक वाहतूक सेवेच्या विस्तारासाठी मोठे पाऊल उचलले असून, २४०० नवीन बसांचा ताफा पीएमपीएमएलमध्ये समाविष्ट केला जात आहे. यामध्ये ४०० CNG बस आधीच दाखल झाल्या असून, पीएमआरडीए, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमार्फत आणखी १००० बस लवकरच येणार आहेत.

याशिवाय, केंद्र सरकारच्या योजनांद्वारेही १,००० अतिरिक्त बस मिळण्याची अपेक्षा आहे. २०३१ पर्यंत ८१०० बस उपलब्ध करण्याचे लक्ष्य गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने दिले असून, त्या दिशेनेही नियोजन सुरू आहे.

दररोजच्या प्रवाशांचा आकडा आणि सेवा क्षमता

कॉरिडॉर दररोज बस फेऱ्या दररोज प्रवासी
निगडी–दापोडी 1800+ 90,000+
दिघी–आळंदी 1100+ 65,800+
सांगवी–किवळे 1100+ 59,500+
काळेवाडी–चिखली 19,000+
नाशिकफाटा–वाकड 10,600+
एकूण 4600+ 2,45,000+

शहरासाठी अत्यावश्यक ठरणारी सेवा

“बीआरटीएस सेवा ही केवळ बस सेवा नाही, ती सार्वजनिक वाहतुकीचा कणा आहे. लाखो लोक यावर अवलंबून आहेत. याला बळकटी देण्यासाठी बसेसची संख्या वाढवणे, कॉरिडॉरचा विस्तार करणे आणि सेवा नियमित व विश्वसनीय ठेवणे ही आमची प्राथमिकता आहे.”
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका

“जरी बीआरटीएस मोठी जागा व्यापते असे वाटत असले तरी वास्तवात ती जागेचा अत्यंत कार्यक्षम वापर करते. आकडेवारी हे स्पष्ट दाखवते की बीआरटीएस ही सर्वाधिक प्रवासी वाहून नेणारी सेवा आहे.”
– बापू गायकवाड, सह शहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका