मुंबई :– भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि माजी टेस्ट कर्णधार रोहित शर्मा याने नुकतीच टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये क्रिकेटच्या प्रवासाबाबत संवाद साधण्यात आला आणि पुढील वाटचालीसाठी फडणवीस यांनी रोहितला शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटर आणि इंस्टाग्रामवर ही माहिती शेअर करताना लिहिले,
“भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा याला ‘वर्षा’ निवासस्थानी भेट देऊन त्याच्याशी संवाद साधणे आणि त्याचे अभिनंदन करणे हा आनंदाचा क्षण होता. त्याच्या टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीबद्दल शुभेच्छा आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!”
रोहितचा “व्हाईट जर्सी”मधील प्रवास : संघर्षातून यशाकडे
रोहित शर्मा याचा टेस्ट पदार्पणाचा प्रवास खडतर राहिला. २०१० साली नागपूरमध्ये पदार्पणाच्या दिवशीच टख्याला दुखापत झाल्यामुळे त्याचे पदार्पण लांबले. त्यानंतर तीन वर्षांनी, २०१३ मध्ये कोलकाता येथे १७७ धावांची शानदार खेळी करत त्याने आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमध्ये दमदार एंट्री केली. पुढील काही वर्षे रोहितने मधल्या फळीत फलंदाजी करताना संघर्ष केला. परंतु, ऑक्टोबर २०१९ मध्ये त्याला सलामीवीर म्हणून बढती मिळाल्यावर त्याच्या टेस्ट कारकिर्दीला नवे वळण मिळाले. त्याच्या पहिल्याच टेस्ट मालिकेत, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, त्याने एक दुहेरी शतक आणि दोन शतके झळकावून आपली योग्यता सिद्ध केली.
“टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त, पण ODI अजून बाकी…” – रोहितचा भावनिक निरोप
नुकत्याच एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये रोहितने आपल्या निवृत्तीबाबत लिहिले : “Hello everyone, I would just like to share that I am retiring from Test cricket. It’s been an absolute honour to represent my country in whites. Thank you for all the love and support over the years. I will continue to represent India in the ODI format.” याआधी २०२४ मध्ये T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहितने T20 फॉरमॅटमधूनही निवृत्ती घेतली होती.
क्रिकेटविश्वात कौतुक आणि सन्मानाचे वातावरण
रोहित शर्माच्या या निर्णयावर अनेक माजी खेळाडू, चाहते आणि क्रिकेट समीक्षकांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याच्या संयमी फलंदाजीची, शांत नेतृत्वशैलीची आणि क्लासिक स्ट्रोकप्लेची आठवण सर्वांनाच येते.
भेटीतून एक सकारात्मक संदेश
मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीत, रोहितने आपल्या क्रिकेट प्रवासातील काही खास क्षण शेअर केले आणि सामाजिक कार्यातही भविष्यात योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे सूत्रांकडून समजते.