Home Breaking News भिवंडीतील गोडाऊन कॉम्प्लेक्सला भीषण आग; मुंबईत वाढत्या आगीच्या घटना चिंतेचा विषय

भिवंडीतील गोडाऊन कॉम्प्लेक्सला भीषण आग; मुंबईत वाढत्या आगीच्या घटना चिंतेचा विषय

21
0

मुंबई, १२ मे: आर्थिक राजधानी मुंबईतील भिवंडी परिसरात सोमवारी सकाळी रिचलँड कॉम्प्लेक्समधील एका मोठ्या वेअरहाऊसला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. आगीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दृष्यांमध्ये warehouse मधून काळ्या धुराचे प्रचंड लोट उठताना स्पष्टपणे दिसून आले. ही आग इतकी तीव्र होती की काही मिनिटांतच आगीने संपूर्ण वेअरहाऊस कॉम्प्लेक्स व्यापून टाकला. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आग लागण्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिक आणि कामगारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त अद्याप प्राप्त झालेलं नाही, मात्र वेअरहाऊसमधील मालाचा प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, मुंबईत मागील दोन आठवड्यांपासून आगीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. निवासी, व्यावसायिक आणि सरकारी इमारतींमध्ये सातपेक्षा अधिक मोठ्या आगीच्या घटना घडल्या असून, आतापर्यंत तीन नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या आगींमध्ये मॉल्स, उंच इमारती यासारख्या ठिकाणी मोठं नुकसान झालं असून अनेक मालमत्तांचे अवशेष फक्त राख झाली आहेत.

मुंबई अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सध्याच्या उष्णतेच्या लाटेमुळे वातानुकूलन प्रणाली (AC) मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे. त्यामुळे जुन्या इमारतीतील वायरिंग सिस्टीमवर मोठा ताण येत असून त्यामुळे शॉर्ट सर्किट आणि आगीच्या घटनांना खतपाणी मिळत आहे. विशेषतः जुन्या इमारतींमध्ये वायरिंगची अवस्था खालावलेली असल्याने या ठिकाणी धोका अधिक वाढतो.

या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने आणि अग्निशमन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, जुने AC, वायरिंग यांची तात्काळ तपासणी व दुरुस्ती करण्यास सांगितले आहे.