रायगड जिल्हा क्रीडाधिकारी प्रकाश वाघ, मुंबई पोलिस अधिकारी ओंकार निंबळे आणि महाराष्ट्र केसरी उपविजेता सोहेल शेख यांचा भव्य सत्कार; खोपोलीत खेळाडूंसाठी प्रेरणादायी सोहळा
खोपोलीतील कुस्ती महर्षी स्व. भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलात नुकत्याच पार पडलेल्या भव्य स्वागत व सत्कार समारंभात रायगड जिल्हा क्रीडाधिकारी पदावर नव्याने नियुक्त झालेले प्रकाश वाघ, मुंबई पोलीस दलातील नव नियुक्त अधिकारी ओंकार निंबळे आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील उपविजेता कुस्तीपटू सोहेल शेख यांचा गौरव करण्यात आला.
या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या हस्ते झालेले सन्मानचिन्ह वितरण. कुस्ती संकुलाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस अधिकारी आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्रीडा विकासासाठी बांधिलकीची ग्वाही:
जिल्हा क्रीडाधिकारी प्रकाश वाघ यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “मी केवळ अधिकारी म्हणून नव्हे, तर एक खऱा क्रीडारसिक म्हणून कार्य करणार आहे. भाऊसाहेब कुंभार यांच्या नावाने उभारलेल्या या संकुलातून भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव करणारे कुस्तीपटू घडवण्याचा निर्धार आहे.”
पोलिस सेवेत यशस्वी प्रवासाची प्रेरणा:
ओंकार निंबळे यांनी विद्यार्थी जीवनातील संघर्ष आणि मेहनतीचा उल्लेख करत सांगितले, “डीवायएसपी होण्याचे स्वप्न मी कॉलेजमध्ये ठरवलं होतं आणि त्या उद्दिष्टासाठी मी अभ्यासासोबत मैदानी शिस्तही पाळली.”
विक्रम कदम यांनीही आजच्या पिढीच्या मोबाईल वापराच्या सवयींबाबत चिंता व्यक्त करत, कुस्ती संकुलातील खेळाडूंनी कसे शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात संतुलन साधले आहे, हे कौतुकास्पद असल्याचे मत मांडले.
सन्मानास साक्षीदार झालेले मान्यवर:
खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत, पो. उपनिरीक्षक पूजा चव्हाण, Godrej & Boyce कंपनीचे CSR प्रमुख तानाजी चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते किशोर ओसवाल, महेंद्र सावंत, लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या माजी अध्यक्षा शिल्पा मोदी, भाजप शहर अध्यक्षा अश्विनी अत्रे, कुस्ती अभ्यासक लोखंडे काका इत्यादींची उपस्थिती कार्यक्रमास विशेष लाभदायक ठरली.
उत्तम सुविधा व जागतिक दर्जाचे प्रशिक्षण हेच ध्येय:
कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्ष राजाराम कुंभार यांनी संकुलात अत्याधुनिक साधनसामग्री, प्रशिक्षक व जागतिक दर्जाचे प्रशिक्षण पद्धती यांचा समावेश करून रायगडातून जागतिक पातळीवरील कुस्तीपटू घडवण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमात रंग भरले:
सुत्रसंचालन जगदीश मरागजे यांनी प्रभावीपणे पार पाडले, तर आभार प्रदर्शन गुरुनाथ साठेलकर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमात खेळाडू, पालक आणि कुस्तीप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
उत्सवात ऊर्जा, प्रेरणेतून शक्ती:
या कार्यक्रमाने केवळ खेळाडूंना नव्हे, तर पालक, प्रशिक्षक आणि प्रशासनाला देखील एक नवा उत्साह व प्रेरणा दिली. खेळ आणि शिक्षण यांचे योग्य संतुलन साधणाऱ्या पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज अधोरेखित झाली.