Home Breaking News मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुण्यातील भावनिक दौरा; शहीद संतोष जगदाळे यांना भावपूर्ण...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुण्यातील भावनिक दौरा; शहीद संतोष जगदाळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

73
0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे दौर्‍यादरम्यान, पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या स्व. संतोष जगदाळे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या दुःखद प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शोकाकुल कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांच्या दुःखात सहभागी झाले.

यावेळी त्यांच्या सोबत राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि आमदार भिमराव तापकीर हेही उपस्थित होते. सर्वांनी मिळून स्व. संतोष जगदाळे यांच्या बलिदानास मानवंदना दिली आणि त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भेटीत सांगितले की, “शहीद संतोष जगदाळे यांचे देशासाठी दिलेले बलिदान अजरामर राहील. महाराष्ट्र सरकार आणि संपूर्ण देश त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यात आम्ही कोणतीही कसूर करणार नाही.”

मुख्यमंत्र्यांनी शहीद कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि तातडीने मदतीचे आदेश दिले. शहीदाच्या कुटुंबासाठी विशेष मदत योजनांची अंमलबजावणी करण्याचेही निर्देश दिले गेले.

या प्रसंगी परिसरातील नागरिकही उपस्थित होते. अनेकांनी अश्रूंच्या धारेत स्व. संतोष जगदाळे यांच्या बलिदानाला सलाम केला. संतोष जगदाळे यांचा पराक्रम आणि त्याग हा महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल.