श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या सुबोध पाटील यांची आज एकनाथ शिंदे यांनी श्रीनगर येथील रुग्णालयात जाऊन भेट घेतली. सुबोध पाटील हे पनवेल तालुक्यातील कामोठे गावाचे रहिवासी असून सध्या त्यांच्यावर श्रीनगरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सुबोध पाटील यांच्या प्रकृतीची सविस्तर चौकशी केली आणि त्यांच्यावर सुरू असलेल्या वैद्यकीय उपचारांची माहिती घेतली. संबंधित डॉक्टरांशी चर्चा करून उपचारात कुठलीही कमतरता राहणार नाही याची खात्री केली. मुख्यमंत्री म्हणाले की, “राज्य सरकार सुबोध पाटील यांच्या उपचारासाठी सर्वतोपरी मदत करेल आणि त्यांच्या पूर्ण पुनर्वसनासाठी आवश्यक ती प्रत्येक मदत तातडीने केली जाईल.”
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सुबोध पाटील यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर दिला आणि “तुम्ही लवकरच बरे होऊन महाराष्ट्रात परत याल,” असे आश्वासन दिले. या वेळी पाटील कुटुंबीयांनाही आश्वस्त करण्यात आले की, शासन त्यांच्यासोबत आहे आणि गरज भासल्यास आर्थिक, वैद्यकीय व भावनिक मदत तात्काळ दिली जाईल.
यावेळी उपस्थित असलेल्या लष्करी अधिकाऱ्यांनीही सुबोध पाटील यांच्या उपचारांची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पहलगाम हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत असे कृत्य कधीही खपवून घेतले जाणार नाही, असे ठामपणे सांगितले.
सुबोध पाटील यांच्याबाबत सर्वत्र सहवेदना व्यक्त होत असून, महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना सुरू केली आहे.