Home Breaking News पुणेकरांना मोठा वाहतूक झटका! पुढील दीड महिना भिडे पूल वाहतुकीसाठी बंद; मेट्रोच्या...

पुणेकरांना मोठा वाहतूक झटका! पुढील दीड महिना भिडे पूल वाहतुकीसाठी बंद; मेट्रोच्या कामामुळे मोठा निर्णय

30
0

पुणे शहरातील मध्यवर्ती व अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी असलेला बाबा भिडे पूल मेट्रोच्या पादचारी पुलाच्या कामामुळे पुढील दीड महिना वाहतुकीसाठी पूर्णतः बंद राहणार आहे. आधीच वाहतूक कोंडीत अडकलेल्या पुणेकरांसाठी ही एक मोठी डोकेदुखी ठरणार आहे.

बाबा भिडे पूल हा नारायण पेठ, सदाशिव पेठ, डेक्कन, एफसी रोड, जे एम रोड तसेच उपनगरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातो. दररोज हजारोंच्या संख्येने वाहने या पुलावरून ये-जा करत असतात. त्यामुळे या पुलाचे अचानक बंद होणे ही नागरिकांसाठी अनपेक्षित धक्का ठरला आहे.

मेट्रो प्रकल्पाचे काम जोमात सुरु असून, डेक्कन जिमखाना स्टेशनजवळील पादचारी पुलाचे बांधकाम सुरू असल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेट्रो प्रशासनाने “क्षमस्व, पुल बंद आहे” अशा पाट्या लावल्या असल्या, तरी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे पूल बंद केल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

वाहतूक कोंडीचा धोका वाढला

या निर्णयामुळे सिंहगड रस्ता, फर्ग्युसन रोड, टिळक रोड, शनिवार पेठ, स्वारगेट, लक्ष्मी रस्ता, पर्वती, डेक्कन, कोथरूड भागात प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे वाहतूक पोलीस विभागाला या भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष नियोजन करावे लागणार आहे.

वाहतूक शाखेवर मोठे आव्हान

बाबा भिडे पूल बंद असल्याने नदीपात्रातून होणाऱ्या वाहतुकीवरही परिणाम होणार असून, पर्यायी मार्गांच्या अभावामुळे वाहनचालक अडकून पडण्याची शक्यता आहे. यामुळे पोलीस प्रशासनासमोर वाहतुकीचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होऊ शकते.