Home Breaking News पिंपरी चिंचवड महापालिकेचा अभिनव उपक्रम : महिला बचत गटांच्या माध्यमातून घरोघरी मिळकत...

पिंपरी चिंचवड महापालिकेचा अभिनव उपक्रम : महिला बचत गटांच्या माध्यमातून घरोघरी मिळकत कर बिले वाटप सुरू

83
0

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी मिळकत कर बिले नागरिकांपर्यंत वेळेवर आणि प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी एक अभिनव उपक्रम राबवत आहे. महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाने महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटातील महिलांच्या माध्यमातून घरपोच बिले वितरित करण्याची जबाबदारी यंदा स्वीकारली आहे.

महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाला नागरिक, महिलांचे बचत गट आणि प्रशासन यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

या उपक्रमाअंतर्गत दि. १५ एप्रिल रोजी महिलांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. कर विभागाचे प्रमुख अविनाश शिंदे यांनी कर प्रणाली, बिल स्वरूप, वितरण प्रक्रिया, अँप्लिकेशन वापर, नागरिकांशी संवाद आणि शंका निवारण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रशिक्षण सत्रात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत समस्यांचे मोकळेपणाने मांडण करत समाधान मिळवले.

दि. १६ एप्रिलपासून बिले वाटप सुरू झाले असून, यामुळे बचत गटातील महिलांना आर्थिकदृष्ट्या बळकट होण्याची संधी प्राप्त झाली आहे. महापालिकेच्या ‘सिद्धी’ प्रकल्पाच्या माध्यमातून या उपक्रमाने महसूल वाढीसोबतच सामाजिक सहभाग, महिला सबलीकरण आणि कार्यक्षम सेवा वितरण यांना चालना दिली आहे.

महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, महिलांना सोसायट्यांमध्ये सहज प्रवेश देऊन सहकार्य करावे, त्यांच्याकडून बिले स्वीकारावीत आणि ३० जूनच्या आत कर भरून १०% सवलतीचा लाभ घ्यावा.

महानगरपालिका संकेतस्थळावर www.pcmcindia.gov.in हे बिले ऑनलाइनही उपलब्ध असून, नागरिकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची मालमत्तेशी योग्यरीत्या नोंदणी करावी, जेणेकरून त्यांना वेळोवेळी अद्ययावत माहिती मिळू शकेल.

यंदाच्या वितरण प्रक्रियेत ज्या बिलांवर “थकबाकीदार” अशी खूण असेल, त्यावर जप्तीपूर्व नोटीस बजावली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी बिले मिळताच तत्काळ भरपाई करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

मुख्य बातम्या शीर्षक:
👉 महापालिकेचा महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम : बचत गटांच्या माध्यमातून घरपोच मिळकतकर बिले वाटप सुरू
👉 कर भरल्यास १०% सवलत, बिले ३० जूनपूर्वी भरा आणि लाभ घ्या
👉 ‘सिद्धी’ प्रकल्पातून महसूलवाढीसह महिला सबलीकरणालाही चालना