पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कुदळवाडीमध्ये अतिक्रमणविरोधी कारवाई केली असली तरी त्याचा मोठा फटका येथील लघु उद्योजकांना बसला आहे. अनेकांनी आपल्या व्यवसायासाठी स्वतःची बचत गुंतवून छोट्या दुकानांची उभारणी केली होती, मात्र कारवाईमुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
भोसरी एमआयडीसीतील आरक्षण क्रमांक ४० प्लॉट क्र. टी.२०१ या भूखंडावर उभारण्यात येणाऱ्या २०८ गाळ्यांच्या इमारतीत कुदळवाडीतील लघु उद्योजकांना प्राधान्य द्यावे, अशी ठाम मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.
महापालिकेच्या पुनर्वसन धोरणावर प्रश्नचिन्ह?
अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेत भूमिपुत्र आणि स्थानिक उद्योजकांचेही मोठे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत त्यांना पर्यायी जागा देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी आवश्यक असलेल्या लघु उद्योजक पुनर्वसन धोरणावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुद्दा उपस्थितच नाही?
नुकत्याच झालेल्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पिंपरी-चिंचवडच्या कोणत्याही आमदाराने कुदळवाडीतील बाधितांचा मुद्दा उपस्थित केला नव्हता. त्यामुळे या भागातील लघु उद्योजकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. यावर आता ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.
प्रस्तावित इमारतीच्या कामासाठी जलद गतीने निर्णय आवश्यक!
महेश लांडगे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, भोसरी एमआयडीसी प्लॉट टी.२०१ वर उभारण्यात येणाऱ्या इमारतीच्या कामासाठी १६ जून २००८ रोजी कार्यादेश देण्यात आला होता. मात्र, १६ वर्षांनंतरही हे काम अद्याप अपूर्ण आहे.
या प्रकल्पात – ✅ २०८ गाळे नियोजित ✅ २९२ ते ६३० चौ. फूट जागेचे वाटप ✅ वाहतुकीसाठी रॅम्प, फायरफायटिंग सिस्टम, लँडस्केपिंग ✅ मटेरियल आणि पॅसेंजर लिफ्ट सुविधा
ही कामे होणार आहेत. मात्र, या गाळ्यांचे वाटप लिलाव पद्धतीने करण्याऐवजी कुदळवाडीतील लघु उद्योजकांना प्राधान्य देण्यात यावे, अशी आग्रही मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
‘लघु उद्योजकांना अन्याय होणार नाही!’ – महेश लांडगे
“महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाईत लघु उद्योजकांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. त्यांचे पुनर्वसन ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे भोसरी एमआयडीसीमधील प्रस्तावित इमारतीत त्यांना गाळे देण्याची तातडीने कार्यवाही करावी. आम्ही या प्रश्नाचा पाठपुरावा करत आहोत आणि लघु उद्योजकांना अन्याय होऊ देणार नाही!”