बारामती, पुणे – बारामती नगरपरिषदेमधील नगररचनाकार विकास किसनराव ढेकळे (वय ५०) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) अधिकाऱ्यांनी पावणेदोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गृह प्रकल्प मंजुरीसाठी मागितली होती लाच
तक्रारदार हे बांधकाम व्यवसायिक असून त्यांनी बारामती नगरपरिषदेत एक गृह प्रकल्प प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी ढेकळे यांनी तब्बल दोन लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर १ लाख ७५ हजार रुपयांवर रक्कम ठरली.
ऑक्सीजन जीममध्ये ठरला व्यवहार; ACBने रचला सापळा
बांधकाम व्यावसायिकाने तातडीने पुणे ACB विभागात तक्रार दाखल केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (१९ मार्च) बारामतीतील ऑक्सीजन जीम येथे सापळा रचला. ढेकळे यांनी मागितलेल्या रकमेचा १ लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना ACB अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले.
या घटनेनंतर ढेकळे यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचारी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
पोलीस अधीक्षकांचे आवाहन
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यांनी नागरिकांना आवाहन करत सांगितले की, “शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास तत्काळ ACB कडे तक्रार द्यावी.”