चिंचवड | बुधवारी (दि. १२) सायंकाळी साडेचारच्या सुमारास चिंचवडमधील केएसबी चौकात चार ते पाच जणांच्या टोळक्याने अचानक दगड आणि काठ्यांच्या साहाय्याने तब्बल ७ ते ८ कारच्या काचा फोडल्या. ही घटना घडताच टोळके पसार झाले.
🟠 घटनास्थळावरची परिस्थिती
केएसबी चौक हा चिंचवडमधील अत्यंत वर्दळीचा आणि महत्त्वाचा चौक आहे. येथील ग्रेडसेपरेटरच्या बाजूला अनेक वाहनचालक आपली वाहने पार्क करतात. बुधवारी सायंकाळी अचानक चौकात आलेल्या टोळक्याने दगडफेक करत वाहनांच्या काचा फोडण्यास सुरुवात केली.
🟠 नागरिकांमध्ये घबराट आणि संताप
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक वाहनधारकांनी आपल्या कारचे नुकसान पाहून संताप व्यक्त केला. नागरिकांच्या जमावामुळे टोळके पसार झाले, मात्र घटनेनंतर नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
🟠 पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
🟠 वाहनचालकांना सतर्कतेचा इशारा
पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना रात्री अपरात्री वाहन पार्क करताना सुरक्षेच्या दृष्टीने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.