Home Breaking News खंडाळा येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा; महिला कर्मचाऱ्यांचा गौरव करत समाजास...

खंडाळा येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा; महिला कर्मचाऱ्यांचा गौरव करत समाजास दिला प्रेरणादायी संदेश

187
0

खंडाळा : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माजी विद्यार्थी संघ खंडाळा यांच्या वतीने लोणावळा नगरपरिषदेच्या प्रा. रामकृष्ण मोरे माध्यमिक विद्यालय खंडाळा येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात खंडाळा गावातील विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा भव्य सत्कार करून त्यांचे कार्य गौरवण्यात आले.

विशेषतः प्राथमिक आरोग्य केंद्र, माध्यमिक विद्यालय खंडाळा, प्राथमिक शाळा खंडाळा, अंगणवाडी सेविका, तसेच आशा सेविका म्हणून कार्यरत असलेल्या महिलांच्या अथक मेहनतीला सलाम करत त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भावना गमे (वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र खंडाळा), श्रीमती विजया चौधरी (औषध निर्माण अधिकारी) आणि विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. रंजना भाले उपस्थित होत्या.

सत्कारार्थी महिलांसह शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक वृंद, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी श्री. नितीन काळे, गावातील ज्येष्ठ नागरिक वसंतदादा कदम, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री. सुरेश गायकवाड आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

सत्कार सोहळ्यानंतर विद्यार्थिनींनी व शिक्षक वृंदाने महिला दिनाचे महत्व आणि महिलांच्या संघर्षमय प्रवासावर आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थिनींनी विविध सादरीकरणांद्वारे महिलांच्या योगदानावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. मंगेश येवले, अशोक गवारणे, सुधीर मोहीते, राजेश महाडिक, सुरेश गायकवाड, मंगेश खराडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन मंगेश खराडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. अशोक गवारणे यांनी मानले.

कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. महिलांच्या सन्मानासह महिला दिनाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.