Home Breaking News आईवर हात उचलला नाही” – मारुती देशमुखांचा बचाव; आईच्या आरोपांवर स्पष्टीकरण देत...

आईवर हात उचलला नाही” – मारुती देशमुखांचा बचाव; आईच्या आरोपांवर स्पष्टीकरण देत खळबळजनक प्रतिक्रिया

123
0

लोणावळा : महाराष्ट्राची कुलदेवता असलेल्या कार्ला येथील आई श्री एकविरा देवी देवस्थानाचे उपाध्यक्ष आणि अजित पवार गटाचे पदाधिकारी मारुती देशमुख यांच्यावर जन्मदात्या आईवर अत्याचार आणि मारहाणीचे गंभीर आरोप झाले होते. मात्र, आता या प्रकरणावर स्वतः मारुती देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली असून, “मी माझ्या आईवर हात उचलला नाही, त्या वेळी मी घरीही नव्हतो,” असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्यांच्या या विधानामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

आईचे गंभीर आरोप – मुलगा मारुती देशमुखांचा स्पष्ट इन्कार

गेल्या काही दिवसांपासून मावळ परिसरात गाजत असलेल्या या प्रकरणात सावित्रीबाई देशमुख यांनी मोठा मुलगा मारुती देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांवर मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप केला होता. त्यांच्या तक्रारीनुसार, मुलगा मारुतीने घरातच त्यांना बेदम मारहाण केली. मात्र, आता मारुती देशमुख यांनी या आरोपांचे खंडन करत “मी त्या वेळी घरी नव्हतोच, मग मी हात उचलण्याचा प्रश्नच येत नाही,” असे स्पष्ट केले आहे.

राजकीय दबावाचा कट? – देशमुखांचा प्रतिआरोप

या संपूर्ण प्रकरणावर मारुती देशमुख यांनी राजकीय षड्यंत्राचा आरोप केला आहे. “मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काही लोक अस्वस्थ झाले. त्यामुळेच माझी प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे या प्रकरणाचा संबंध थेट राजकीय कुरघोडीशी असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

आईच्या न्यायासाठी जनतेचा आक्रोश; कठोर कारवाईची मागणी

सावित्रीबाई देशमुख यांना झालेल्या त्रासामुळे मावळ परिसरात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत या प्रकरणात “आईला न्याय मिळाला पाहिजे” अशी जोरदार मागणी लावून धरली आहे. नागरिकांनी “आईवर अत्याचार करणाऱ्यांना माफ करणार नाही” असा रोष व्यक्त करत देशमुख कुटुंबावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.