पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तब्बल १६ वर्षांपासून फरार असलेल्या हत्येच्या आरोपीला अखेर गोव्यातून अटक केली आहे. सुरक्षारक्षकाच्या नोकरीदरम्यान झालेल्या किरकोळ वादातून झालेल्या खुनाच्या प्रकरणात हा आरोपी तब्बल दीड दशकापासून वेगवेगळ्या राज्यात लपून राहत होता. अखेर पोलिसांनी अतिशय शिताफीने तपास करत त्याला जेरबंद केले आहे.
🔴 आरोपीचा १६ वर्षांचा पलायन प्रवास अखेर संपला!
सन २००९ मध्ये सांगवी येथे सुभाष धाकतोंडे (५५, रा. रहाटणी) यांचा खून करणारा आरोपी सुनील अशोकराव कांगणे (३९, रा. सुलाभट, गोवा, मूळ रा. नांदेड) याला पोलिसांनी गोव्याहून अटक केली. या आरोपीवर सुरक्षारक्षक म्हणून काम करत असताना झालेल्या वादातून धारदार शस्त्राने हत्या केल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर सुनील कांगणे तात्काळ पसार झाला. तो त्याच्या मूळ गावी न जाता वेगवेगळ्या राज्यांमध्ये ओळख लपवत वास्तव्य करत होता. त्याने वारंवार ठिकाणे बदलून पोलिसांना गुंगारा दिला. मात्र, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अथक प्रयत्न करून त्याचा मागोवा घेतला आणि गोव्यातून त्याला ताब्यात घेतले.
🔴 हत्या का केली? २००९ च्या घटनेचा थरार
पोलिस उपयुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील कांगणे हा २००९ साली सांगवी परिसरात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होता. सुभाष धाकतोंडे यांनी त्याच्या कामाचा पॉईंट बदलल्यामुळे रागाने संतप्त झालेल्या सुनीलने त्यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला.
त्याच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तो पोलिसांना सतत चकवा देत वेगवेगळ्या राज्यात राहून ओळख लपवत होता. गेल्या १६ वर्षांपासून पोलिसांना त्याचा थांगपत्ता लागला नव्हता.
🔴 पोलिसांना मिळाले गुप्त माहितीचे सूत्र!
गुन्हे शाखेचे युनिट एकचे पोलीस अंमलदार प्रमोद गर्जे यांना माहिती मिळाली की सुनील कांगणे हा सध्या गोव्यात राहत आहे. पोलिसांनी ही माहिती त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आणि एक विशेष पथक गोव्याला रवाना झाले.
तपास पथकाने गोव्यात सुलाभट येथे छापा टाकला आणि सुनील कांगणे याला अटक केली. त्याच्या अटकेने १६ वर्षांपासून सुरू असलेला तपास पूर्ण झाला असून, आरोपीला सांगवी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
🔴 पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईमुळे न्याय मिळण्याची आशा
१६ वर्षांपूर्वी झालेल्या या हत्याकांडाच्या गुन्ह्यात न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तब्बल दीड दशक पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला अटक झाल्याने न्यायप्रणालीला मोठी मदत होणार आहे.
या कारवाईसाठी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार प्रमोद गर्जे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष योगदान दिले.
🔴 पोलिसांचे नागरिकांना आवाहन!
कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीविषयी किंवा संशयास्पद व्यक्तींची माहिती असल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.