पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक–२ ने प्रभावी कारवाई करत देशी बनावटीची दोन गावठी पिस्तुले आणि एक जिवंत काडतूस बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई पुणे शहरातील वाढत्या अवैध शस्त्रप्रकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक–२ चे पोलीस निरीक्षक श्रीमती वर्षा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार आझाद पाटील आणि पवन भोसले यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यातील मागील सात महिन्यांपासून फरार असलेला आरोपी शुभम कैलास कामठे (वय ३०, रा. कदम वाक वस्ती, लोणी काळभोर) याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.
झडतीदरम्यान शुभम कामठे याच्या कमरेला एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस मिळून आले. त्याच्यासोबत असलेल्या शुभम श्रीमंत रसाळ (वय १९, रा. फुरसुंगी, पुणे) याच्याकडेही एक गावठी पिस्तूल आढळून आले. एकूण सुमारे ८०,५०० रुपये किमतीची दोन गावठी पिस्तुले आणि एक जिवंत काडतूस बेकायदेशीररीत्या बाळगल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ४३६/२०२५ अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३ (२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१), १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोपी शुभम कैलास कामठे याच्यावर पुणे शहर हद्दीत यापूर्वीही तब्बल ८ गंभीर गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे.
ही यशस्वी कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे–२) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. खंडणीविरोधी पथक–२ मधील पोलीस निरीक्षक श्रीमती वर्षा देशमुख, पोलीस उपनिरीक्षक गौरव देव तसेच पोलीस अंमलदार अजिनाथ येडे, दिलीप गोरे, अनिल कुसाळकर, अमोल घावटे, किरण पड्याळ, अमोल राऊत, आझाद पाटील, पवन भोसले, गणेश खरात आणि प्रशांत शिंदे यांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली. या कारवाईमुळे पुणे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांना मोठा धक्का बसला असून, अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.