Home Breaking News मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा; पुणे जिल्ह्यात वाहतूक बदलाचे आदेश जारी

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा; पुणे जिल्ह्यात वाहतूक बदलाचे आदेश जारी

96
0
मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी काढलेल्या भव्य मोर्चामुळे पुणे जिल्ह्यातील अनेक भागांतील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर समाजबांधव सहभागी होणार असल्याने कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी आणि वाहतूक कोंडी टाळावी, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विशेष आदेश जारी केले आहेत. हे आदेश शुक्रवार, दि. २९ ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहेत.
मोर्चाची सुरुवात ऐतिहासिक किल्ले शिवनेरी येथून होणार असून नारायणगावमार्गे मंचर-खेड-चाकण-तळेगाव ते लोणावळामार्गे मुंबईकडे समाजबांधवांचा प्रवास होणार आहे. या प्रवासादरम्यान हजारो नागरिक रस्त्यावर उतरतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी व पर्यायी मार्गांच्या वापरासाठी प्रशासनाने तपशीलवार योजना आखली आहे.
नगर-कल्याण मार्गावरील वाहतूक १४ नंबर जांबुत फाट्यापासून नगरकडे जाणाऱ्या वाहनांना बोर-बेल्हे-अळकुटी-पारनेर-अहिल्यानगरमार्गे वळविण्यात येणार आहे. तर नारायणगावकडून जुन्नरकडे जाणारी वाहतूक ओझर फाटा-कारखाना फाटा-शिरोली बुद्रुकमार्गे वळविली जाणार आहे.
नारायणगावकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुणे-नाशिक महामार्ग क्र. ५० व बायपासमार्गे कारफाटा-मंजर पोलीस स्टेशन-नागपूर-रोडेवाडी फाटा-लोणी-पाबळमार्गे शिक्रापूर-नगर रोडमार्गे वळविण्यात आली आहे. तसेच नारायणगाव बायपास क्र. ६० मार्गे मंचर-निघोटवाडी-जीवन खिंड-नंदी चौकातून वाहतूक सुरळीतपणे चालविण्यात येईल.
खेड शहराकडून पुण्याकडे येणारी वाहने पाबळमार्गे वळवली जातील. जुन्या पुणे-मुंबई महामार्ग क्र. ४८ वरील सर्व वाहतूक नवीन पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वळविण्यात आली आहे. चाकण-देहुरोडकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक वडगाव फाट्यावरील द्रुतगती मार्गावरुन उर्से टोलनाकामार्गे मुंबईकडे पाठवली जाईल.
मुंबईकडून पुण्याकडे येणारी वाहने लोणावळा शहरात न वळवता थेट द्रुतगती मार्गावरून पुढे पाठवली जातील. तसेच लोणावळा शहर परिसरातील सर्व वाहतूकही वलवण पुलावरुन थेट द्रुतगती मार्गावर जाईल.
यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, वाहतूक विभाग आणि पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून नागरिकांना अडचण होऊ नये यासाठी मोठी खबरदारी घेतली आहे.