Home Breaking News मुक्या जीवांसाठी पाण्याचा हक्क! – वॉटर फॉर व्हॉइसलेस संस्थेच्या वतीने मोफत वॉटर...

मुक्या जीवांसाठी पाण्याचा हक्क! – वॉटर फॉर व्हॉइसलेस संस्थेच्या वतीने मोफत वॉटर बाऊल वितरण उपक्रम खोपोलीत उत्साहात संपन्न

80
0

खालापूर | प्रतिनिधी – श्रावणी कामत | उन्हाळ्याच्या तडाख्यात केवळ माणसांनाच नव्हे, तर मुक्या जीवांनाही तहान लागते. मात्र ती व्यक्त करता येत नसते. अशा वेळेस माणुसकीची जाणीव असलेल्या संवेदनशील नागरिक आणि सामाजिक संस्थांनी पुढे येत केलेली मदत हीच खरी “मूक प्राण्यांची भाषा” ठरते. अशाच एका हृदयस्पर्शी आणि पर्यावरण पूरक उपक्रमाची “वॉटर फॉर व्हॉइसलेस (WFV)” या संस्थेच्या माध्यमातून यंदाही पुनरावृत्ती करण्यात आली.

डब्ल्यू.एफ.व्ही. या संस्थेच्या वतीने देशभर विविध ठिकाणी मुक्या प्राणी आणि पक्ष्यांसाठी उन्हाळ्यात पाण्याची सोय व्हावी म्हणून दरवर्षी मोफत वॉटर बाऊल्स वितरित केले जातात. यावर्षी देखील ऑनलाइन नोंदणीच्या माध्यमातून प्राणीप्रेमींनी वॉटर बाऊल्सची मागणी नोंदवली होती.

खालापूर तालुक्यातील शास्त्रीनगर, खोपोली येथील हेल्प फाउंडेशनच्या कार्यालयात हा उपक्रम पार पडला. खालापूर तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विष्णू काळे, श्रीकृपा एक्वेरियमचे प्रमुख प्रवीण शेंद्रे, हेल्प फाउंडेशनचे निलेश कुदळे, आणि प्रसिद्ध गोरक्षक हनीफ कर्जीकर यांच्या हस्ते वॉटर बाऊलचे वाटप करण्यात आले.

डॉ. विष्णू काळे यांनी यावेळी सांगितले, “या उपक्रमामुळे मुक्या जीवांना उन्हाळ्यात दिलासा मिळतो. मुंबई-पुणे महामार्ग, खंडाळा घाट आणि खोपोली शहरातील मोक्याच्या ठिकाणी हे बाऊल ठेवले जाणार असून, प्राणीमित्र दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यात नियमितपणे पाणी भरण्याचे कार्य करत राहतील.”

या उपक्रमाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:

संपूर्णपणे विनामूल्य वॉटर बाऊल वाटप

ऑनलाइन रजिस्ट्रेशन पद्धतीने मागणी

मोक्याच्या ठिकाणी बाऊल ठेवण्याची योजना

स्थानीय स्वयंसेवक व प्राणीमित्रांची जबाबदारीने सहभाग

पर्यावरणपूरक आणि मानवी सहवेदना अधोरेखित करणारा दृष्टिकोन

श्रीकृपा एक्वेरियम, हेल्प फाउंडेशन, व अनेक प्राणीमित्रांनी यामध्ये सहकार्य करून या उपक्रमाला व्यापक रूप दिले.

“प्रत्येक थेंब जीव वाचवतो” ही संकल्पना घेऊन, या उपक्रमाद्वारे अनेक जीवांना दिलासा मिळणार आहे. केवळ प्राणीप्रेम नव्हे, तर मानवी संवेदनशीलतेचाही हा सुंदर प्रत्यय ठरतो.”