पुणे शहरातील हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आर्थिक व्यवहाराच्या वादातून अपहरण झालेल्या व्यक्तीची अवघ्या ६ तासांत सुटका करण्यात आली असून, पोलिसांनी या प्रकरणातील प्रमुख आरोपीसह इतरांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या वेगवान तपासामुळे संभाव्य मोठ्या गुन्ह्याला आळा घालण्यात आला.
घडलेल्या प्रकाराचा थरार
पीडित व्यक्तीच्या घरी अचानक ४ ते ५ अनोळखी इसम आले. त्यांनी फर्निचरच्या कामाचे कारण सांगत पीडित व्यक्तीस घरी बोलावले आणि नंतर त्याला सोबत घेऊन गेले. त्यानंतर रात्री १ वाजता पीडिताने कुटुंबीयांना फोन करत “मी सकाळपर्यंत घरी परत येतो,” असे सांगितले आणि फोन बंद झाला. यामुळे पीडिताच्या कुटुंबियांनी त्वरित हडपसर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.
पोलीस यंत्रणेची जलद कारवाई
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपास मोहीम हाती घेतली. मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी विशेष पथक तयार केले.
तांत्रिक तपास आणि सुटकेची यशस्वी मोहीम
अपहृत व्यक्तीच्या मोबाईलवर आलेले कॉल तपासले असता फोन बंद आढळला. मात्र, तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असल्याचे आढळून आले. खेड शिवापूर, शिंदेवाडी, जांभूळवाडी, नन्हे या भागांत संशयितांची हालचाल होत असल्याची माहिती मिळाली. यावेळी पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की आरोपी कात्रज घाटाच्या पायथ्याशी येणार आहेत. पोलिसांनी लगेच सापळा रचून पीडितास सुखरूप सोडवले आणि एका आरोपीस ताब्यात घेतले.
आरोपींनी कबुली दिली! आर्थिक व्यवहाराच्या वादातून केले अपहरण
प्राथमिक चौकशीत आरोपी प्राजस दीपक पंडित (२५, रा. स्वामी सदन, त्रिमूर्ती चौक, भारती विद्यापीठ, पुणे) याने आर्थिक व्यवहारातून पैशांची वसुली करण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याचे मान्य केले. या प्रकरणातील इतर आरोपींची चौकशी सुरू असून लवकरच त्यांना अटक केली जाणार आहे.
पोलीस यंत्रणेचा उल्लेखनीय पराक्रम
ही यशस्वी कारवाई अप्पर पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अविनाश गोसावी, संदीप राठोड, श्रीकांत पांडुळे, दीपक कांबळे, चंद्रकांत रेजितवाड, अजित मदने, अमोल दणके, कुंडलिक केसकर, अमित साखरे, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महावीर लोंढे, महेश चव्हाण, बापू लोणकर, अमोल जाधव या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली.