Home Breaking News मुंबईत न्यायाच्या नव्या युगाची सुरुवात! वांद्रे (पूर्व) येथे उभारला जाणार उच्च न्यायालयाचा...

मुंबईत न्यायाच्या नव्या युगाची सुरुवात! वांद्रे (पूर्व) येथे उभारला जाणार उच्च न्यायालयाचा नवा भव्य संकुल

117
0
मुंबई | महाराष्ट्राच्या न्यायव्यवस्थेच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल! मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथे नव्या उच्च न्यायालय संकुलाच्या भूमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा आज अत्यंत उत्साहात आणि भव्यतेने पार पडला. भारताचे सरन्यायाधीश मा. न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या शुभहस्ते या संकुलाचे भूमिपूजन झाले. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रसंगी सांगितले की, “आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आहे. न्यायालयाचं विकेंद्रीकरण हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘सर्वांसाठी न्याय’ हा विचार आज प्रत्यक्षात साकारतो आहे.” त्यांनी पुढे नमूद केले की, “या प्रकल्पासाठी राज्य सरकारने आधीच १५ एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे आणि आणखी १५ एकर जमीन मार्च अखेरपर्यंत दिली जाणार आहे.”
मुंबई उच्च न्यायालयाचा इतिहास अत्यंत समृद्ध आहे. ब्रिटिश काळापासून न्यायदानाच्या परंपरेला आकार देणाऱ्या या न्यायालयाच्या नव्या वास्तूमुळे न्यायदान अधिक वेगवान, पारदर्शक आणि सर्वसामान्य जनतेसाठी सुलभ होईल. नवी इमारत अत्याधुनिक तंत्रज्ञानासह उभारली जाणार असून, यात डिजिटल कोर्टरूम्स, वकील व न्यायाधीशांसाठी अत्याधुनिक सुविधा, तसेच जनतेसाठी सोयीस्कर परिसर निर्माण करण्यात येणार आहे.
अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असा शब्द दिला. त्यांनी स्पष्ट सांगितले की, “न्यायव्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी आणि जनतेच्या न्यायहक्कासाठी राज्य सरकार सदैव कटिबद्ध आहे.”
सरन्यायाधीश भूषण गवई यांनी या प्रसंगी महाराष्ट्र सरकारचे कौतुक करत सांगितले की, “ही नवी इमारत केवळ न्यायालय नसून, ती न्याय, पारदर्शकता आणि संविधानिक मूल्यांचे प्रतीक ठरेल.” या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, न्यायमूर्ती, वकील, अधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.