पिंपरी-चिंचवड | २० सप्टेंबर २०२५ :- पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांच्या अडचणींना थेट ऐकून त्यावर त्वरित तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी ९ वाजता काळेवाडीतील रागा पॅलेस हॉटेल येथे जनसंवाद कार्यक्रमाची सुरुवात केली.
या उपक्रमात नागरिकांना उपमुख्यमंत्र्यांसमोर आपली समस्या थेट मांडण्याची संधी मिळाली असून, प्रशासनाच्या विविध विभागांचे अधिकारी तात्काळ उपाययोजना करण्यासाठी उपस्थित आहेत.
या जनसंवादात मालमत्ता कर, बांधकाम परवानगी, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, शिक्षण, सामाजिक न्याय, झोपडपट्टी पुनर्वसन, म्हाडा, पीएमआरडीए, महसूल, शिधापत्रिका, महावितरण, वीजपुरवठा, सहकार, आरोग्य, पोलीस, क्रीडा, धर्मादाय आयुक्तालय, पीएमपीएल अशा महत्त्वाच्या विभागांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी सांगितले की, “शासन आणि नागरिक यांच्यातील अंतर कमी करणे, शासन निर्णय पारदर्शकतेने राबवणे आणि लोकांच्या अडचणींना तातडीने न्याय मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.”
या उपक्रमामुळे नागरिकांना विविध दफ्तरदारीची चकरा माराव्या लागणार नाहीत, तसेच त्यांचे प्रश्न एका छताखाली सोडवले जातील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.
रविवारी, २१ सप्टेंबर रोजी अजित पवार कार्यकर्त्यांशीही संवाद साधणार असून, पक्ष संघटनात्मक कार्य आणि विकास प्रकल्पांवर चर्चा होणार आहे.
या कार्यक्रमामुळे पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या अपेक्षांना थेट आवाज मिळत असून, शासन त्यांच्या दारी पोहोचत असल्याचा सकारात्मक संदेश दिला जात आहे.