Home Breaking News त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर भ्याड हल्ला; ‘व्हाईस ऑफ मिडीया’ शेगावतर्फे निवेदन, पत्रकार संरक्षण...

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर भ्याड हल्ला; ‘व्हाईस ऑफ मिडीया’ शेगावतर्फे निवेदन, पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाईची मागणी

70
0
शेगाव – त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर २० सप्टेंबर रोजी आयोजित बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. या प्रकरणी व्हाईस ऑफ मिडीया तालुका शेगाव यांच्यावतीने २२ सप्टेंबर रोजी अधिकृत निवेदन देण्यात आले.
या हल्ल्यात इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे पत्रकार योगेश खरे, अभिजित सोनवणे आणि किरण ताजने गंभीर जखमी झाले आहेत. स्वच्छ, सुसंस्कृत आणि प्रगत महाराष्ट्रात घडलेली ही घटना अत्यंत निंदनीय असल्याचे संघटनेतर्फे निवेदनात नमूद करण्यात आले.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याने अशा हल्ल्यांनी केवळ व्यक्तीगत हानी होत नाही, तर लोकशाही व्यवस्थेवरच आघात होतो. म्हणूनच आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर विशेष सरकारी वकिलांमार्फत खटला चालवून आरोपींना कठोर शासन व्हावे, यावर संघटनेने भर दिला आहे.
पत्रकारांना आपले कार्य सुरक्षित वातावरणात पार पाडता यावे, यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली. भविष्यात अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून प्रशासनाने सुरक्षा उपाययोजना बळकट करणे आवश्यक असल्याचे व्हाईस ऑफ मिडीया संघटनेने स्पष्ट केले.
या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष अमर बोरसे, तालुकाध्यक्ष नानाराव पाटील, तालुका सचिव ज्ञानेश्वर ताकोते, शहराध्यक्ष दिनेश महाजन, डिजिटल मीडिया अध्यक्ष समीर देशमुख, तसेच पत्रकार राजवर्धन शेगावकर, ललित देव पुजारी, विठ्ठल अवताडे, प्रकाश उन्हाळे, समीर आझाद, दिनेश घाटोळ आदी मान्यवरांच्या सह्या होत्या.
या संपूर्ण घटनेमुळे पत्रकारांमध्ये संतापाचे वातावरण असून, पत्रकारांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.