Home Breaking News जिल्ह्यातील नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी, छोटे नदी-नाल्यांच्या पाण्यावरही समन्वयाने प्रक्रिया करू ...

जिल्ह्यातील नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी, छोटे नदी-नाल्यांच्या पाण्यावरही समन्वयाने प्रक्रिया करू – नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

154
0
 पुणे : पुणे जिल्ह्यातील प्रमुख नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांना गती मिळाली असून, या प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी केवळ मोठ्या नद्यांवरच नव्हे, तर त्यात मिळणाऱ्या छोट्या नदी-नाल्यांच्या पाण्यावर देखील प्रक्रिया करण्याची गरज आहे. यासाठी लवकरच पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत नगरविकास व सामाजिक न्याय विभागाच्या राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ, खासदार श्री. श्रीरंग बारणे, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखरसिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री श्री. मोहोळ म्हणाले की, पुणे जिल्हा हा औद्योगिक, शैक्षणिक तसेच माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात देशात अग्रस्थानी असून जलप्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. ग्रामीण व शहरी भागातील गटार व औद्योगिक सांडपाणी थेट नद्यांमध्ये मिसळल्याने पाणी प्रदूषण वाढले आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून प्रकल्प उभारले जात आहेत. परंतु, फक्त प्रमुख नद्यांवरच प्रकल्प उभारून उपयोग होणार नाही, तर उपनद्या, नाले व गटार पाण्यावरही शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया होणे अत्यावश्यक आहे. यासाठी सर्व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व नियोजन प्राधिकरणांनी उत्तम समन्वयासाठी प्रयत्न करावेत.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेकडून 10 नवे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. यामुळे कचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण व स्वच्छता उपक्रमांना चालना मिळून पर्यावरण संतुलन साधण्यास मदत होणार आहे.
पुणे शहरातील रस्त्यावरील वाहतुकीचा ताण  कमी करण्यासाठी पुणे मेट्रोचा वाटा वाढत असून जुलै मध्ये एक लाख 92 हजार प्रवासी तर ऑगस्ट मध्ये हा आकडा वाढून 2 लाख 13 हजार प्रवासी असा झाल्याचे पुणे मेट्रो कडून सांगण्यात आले. पुढचा टप्पा दोनचे प्रस्ताव वेगवेगळ्या टप्यावर आहेत. त्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच त्याचे काम सुरु होईल. त्या कामाला अधिक गती देण्याचे निर्देश यावेळी मंत्री श्री. मोहोळ यांनी दिले.
पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मीनलच्या नूतनीकरणाचे काम डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. तसेच नव्या टर्मीनलच्या जागेच्या अधिग्रहणाचे काम सुरु करण्यात आले असून मार्किंगचे काम पूर्ण झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
या बैठकीत जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्ते विकास, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय व कल्याण विभागाच्या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विशेषतः केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीत गती आणण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यातील समन्वय वाढविण्याचे निर्देश बैठकीतून देण्यात आले. जिल्ह्यातील नदी स्वच्छता, शाश्वत कचरा व्यवस्थापन, हरित ऊर्जा निर्मिती, ग्रामीण विकास आणि शहरी भागातील मूलभूत सुविधा या सर्वच क्षेत्रांमध्ये कार्यक्षम व पारदर्शक अंमलबजावणी होणे हीच जिल्हा विकास समितीची प्राथमिकता असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
1) भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाकरिता पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन
भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना ‘एसएसबी’ या परीक्षेच्या तयारीकरिता छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत एसएसबी अभ्यासक्रम क्रमांक ६२ चे आयोजन करण्यात येणार आहे. या संधीचा लाभ घेण्याकरिता जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे १७ सप्टेंबर रोजीपर्यंत मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मुलाखतीस येतांना सैनिक कल्याण विभागाच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर एसएसबी -६२ या अभ्यासक्रमाकरिता असलेले प्रवेशपत्र किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने देण्यात आलेल्या प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची मुदित प्रत तीन प्रतीत भरुन सोबत घेऊन यावी. अभ्यासक्रम कालावधीत प्रशिक्षणार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाणार आहे.
या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याकरिता पुढीलपैकी कोणतीही एक पात्रता इच्छुक उमेदवारांनी धारण केलीली असावी उमेदवार कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेन्स अॅकडमी एक्झामिनेशन उत्तीर्ण झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे.  एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्र ‘ए’ किंवा ‘बी’ ग्रेड मध्ये उर्तीर्ण झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीकरिता शिफारस केलेली असावी.  टेक्नीकल सॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणाली  एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबी साठी शिफारस केलेल्या यादीत नांव असावे. यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेऊन यावे. 
अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्या training.pctcnashik@gmail.com या ईमेल पत्ता व ०२५३-२४५१०३२ दुरध्वनी क्रमांक किंवा ९१५६०७३३०६ व्हॉटसअप क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.)  यांनी केले आहे.
2) विभागीय आयुक्त कार्यालयाच्या व्हॉट्सॲप चॅनेलचे उद्घाटन
  विभागीय आयुक्त कार्यालयाच्या ‘डिव्हिजनल कमिशनर ऑफिस पुणे डिव्हिजन’  (divisional commissioner Office, Pune division) या व्हॉट्सॲप चॅनलचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सामान्य प्रशासन अपर आयुक्त तुषार ठोंबरे, सह आयुक्त अरुण आनंदकर, विकास गजरे, संजीव पलांडे, सहायक आयुक्त किर्ती नलावडे आदी उपस्थित होते.
राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी १५० दिवसांचा कार्यालयीन सुधारणांचा आराखडा निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये विविध घटक समाविष्ट असून ई- गव्हर्नन्स या महत्त्वाच्या घटकाचाही यात समावेश आहे. ई-गव्हर्नन्सच्या अनुषंगाने कार्यालयांतर्गत तसेच नागरिकांनाही विभागीय आयुक्त कार्यालयातून राबविण्यात येणाऱ्या योजना, त्यासाठी देण्यात येणारा निधी, विविध विषयांची माहिती आदी या व्हॉट्सॲप ग्रुपवर देण्यात येणार आहे. विभागीय आयुक्तालयातील कामकाज अधिक गतीमान करणे, पारदर्शकतेच्या माध्यमातून जनमानसात प्रशासनाची विश्वासार्हता वाढविणे आदी बाबी या चॅनेलच्या माध्यमातून साध्य होणार आहेत.
3) अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांनी १ सप्टेंबरपर्यंत शिष्यवृत्तीकरिता अर्ज करावे 
समाज कल्याण आयुक्तालयामार्फत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्यास १ सप्टेंबर मुदतवाढ देण्यात आली आहे.
यापूर्वी विद्यार्थ्याकडून जाहिरातीद्वारे अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत १८ ऑगस्ट २०२५ होती आता ही नव्याने मुदवाढ देण्यात आली आहे. सन 2025-26 करीता यापूर्वी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा अर्ज करुन नये.
अर्जाची नोंदणी करतांना www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विहीत नमुन्यातील परिपूर्ण भरलेला अर्ज, वाचनीय व सुस्पष्ट कागदपत्रे ऑनलाईन सादर करुन त्याची सुस्पष्ट प्रत, ऑफलाईन नमून्यातील अर्जासोबत समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयास १ सप्टेंबर २०२५ रोजी ६.१५  वाजेपर्यंत सादर करावीत.अधिक माहितीसाठी संकेतस्थळावरील “ताज्या घडामोडी” लिंकवर भेट देवून या संधीचा अधिकाधिक इच्छुक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
4) महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगाच्यावतीने पुण्यात जनसुनावणी संपन्न 
नागपूर येथील बीएस एज्युकेशन संस्थेबाबत प्राप्त तक्रारींची महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगाने गंभीर दखल घेतली असून याबाबत  आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने सखोल चौकशी करुन वस्तुनिष्ठ तपशीलवार अहवाल आयोगाकडे १५ दिवसात सादर करावा, असे निर्देश महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगाचे ॲड. धर्मपाल मेश्राम दिले आहेत.
व्हीव्हीआयपी विभाश्रगृह येथील सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था (बार्टी), आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टार्टी) छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) यांच्याकडे बीएस एज्युकेशन संस्थेबाबत प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने आयोजित जनसुनावणीत त्यांनी हे निर्देश दिलेत.यावेळी महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगाचे विधी अधिकारी ॲड. राहूल झांबरे, बार्टीच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी स्नेहल भोसले, निबंधक इंदिरा अस्वार, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या सहसंचालक चंचल पाटील, सारथीच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या वतीने कौशल्य विभागाचे वरिष्ठ प्रकल्प संचालक सतीश पाटील आदी उपस्थित होते.
ॲड मेश्राम म्हणाले, नागपूर येथील बीएस एज्युकेशन या बँकिग विषयक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेविषयी विविध माध्यमातून तक्रारी प्राप्त झाल्या असून याची आयोगाने गांर्भीर्याने दखल घेतली आहे. यासंबधी तक्रार व तक्रारदार संस्थांनी केलेल्या तक्रारीची आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने मुद्येनिहाय चौकशी करावी, चौकशी करतांना तक्रारदार किंवा तक्रारदार संस्थांनी बीएस एज्युकेशन संस्थेविरुद्ध नमूद केलेले मुद्दे, विविध माध्यमातील वृत्त, संस्थेविरुद्ध मनपा, अग्निशमन विभाग व सहायक संचालक नगररचना अशा विविध विभागाने केलेल्या कारवाया, अटी व शर्तींचा भंग, विद्यार्थ्यांचे शपथपत्र आदी बाबींची सर्वंकष चौकशी करावी, याकरिता आवश्यकतेनुसार मुनष्यबळ उपलब्ध करुन घ्यावेत. बार्टी संस्थेने तक्रारदार किंवा तक्रारदार संस्थांनी बीएस एज्युकेशन संस्थेबाबत मागितलेली माहिती तात्काळ प्रभावासह उपलब्ध करुन त्याचा अहवाल आयोगाकडे सादर करावा. सारथी संस्थेकडे प्राप्त तक्रारीची मुद्देनिहाय चौकशी करुन सारथी संस्थेच्या प्रमुखाच्या अभिप्रायसह वस्तुनिष्ठ चौकशी अहवाल सादर करावा. चौकशी करतांना संस्थेबाबत करण्यात आलेला सामंजस्य करार, संस्था निवडीकरिता राबविण्यात आलेली निवडप्रक्रिया आदी माहिती विचारात घेण्याचे निर्देश ॲड मेश्राम यांनी दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था (बार्टी), आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टार्टी) छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) यासंस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नागरी सेवा, राज्य सेवा, अभियांत्रिकी सेवा, बँकींग, मिलीटरी भरती, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देण्याचे काम करण्यात येत आहे, याकरिता शासनाच्यावतीने करोडो रूपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येत असतो. या प्रक्षिणाचा उपयोग त्यांचे स्पर्धा परीक्षांमधील यश व सामाजिक आर्थिक जीवनमान उंचविण्याकरिता झाला पाहिजे, या कामांमध्ये हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश ॲड मेश्राम यांनी दिले. यावेळी बैठकीत तक्रारदार व तक्रारदार संस्था यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित विभागाने करण्यात आलेली कार्यवाही बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
5) राजगुरुनगर येथील वसतिगृह प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करावे 
 सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात व्यवसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी बी.सी.ई.बी.सी मुलींचे शासकीय वसतीगृह राजगुरुनगर येथे प्रवेश घेण्याकरिता https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर १५ सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत वसतिगृहात इयत्ता 8 वी व पुढील शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय अनुसूचित जाती, अनूसुचित जमाती, विमुक्त जमाती भटक्या जाती, विशेष मागासप्रवर्ग, दिव्यांग व अनाथ मुलींना शासनाने निर्धारित केलेल्या टक्केवारीच्या अधीन राहून रिक्त जागांवर प्रवेश देण्यात येणार आहे. या संधीचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.  अधिक माहितीसाठी बी.सी.ई.बी. सी. मुलींचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल  पी.व्ही. आंबले- ७५०७५९०६४७ यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन गृहपालानी केले आहे.
6) उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि ग्रंथमित्र पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत कार्यरत ग्रंथालय संचालनालयामार्फत सन २०२४-२५ या वर्षासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार, डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कराकरिता ३० सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, नागरिकांना उत्कृष्ट ग्रंथालयीन सेवा मिळावी आणि वाचनसंस्कृतीला चालना मिळावी या उद्देशाने दरवर्षी हे पुरस्कार देण्यात येतात. शहरी व ग्रामीण विभागातील ‘अ’, ‘ब’, ‘क’ व ‘ड’ वर्गातील उत्कृष्ट ग्रंथालयांना अनुक्रमे  १ लाख, ७५ हजार, ५० हजार व २५ हजार रुपये इतकी रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरव करण्यात येतो. त्याचबरोबर राज्यातील एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व एक उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी ५० हजार रुपये तर प्रत्येक महसुली विभागातून निवडलेल्या उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी २५ हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथभेट दिली जाईल.
इच्छुक ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक यांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह विहीत मुदतीत तीन प्रतींमध्ये आपल्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले यांनी केले आहे.
7) राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा रॅली संपन्न
 भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व हॉकीचे जादूगार मे. ध्यानचंद यांच्या जन्मदिनी 29 ऑगस्ट रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना व चॉईस महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात संपन्न झाला. तसेच गोळीबार मैदान ते सेव्हन लव्हज चौक मार्गे ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, गंज पेठ दरम्यान क्रीडा रॅली आयोजित करण्यात आली.
क्रीडा रॅलीस जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे व प्राचार्य डॉ. आफताब अन्वर शेख, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी ताहेर अस्सी, यांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. यावेळी श्री. लकडे यांनी आपले विचार व्यक्त केले. या जनजागृती प्रभात फेरीत पूना कॉलेज व परिसरातील 20 माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील जवळपास 1 हजार खेळाडू व क्रीडाप्रेमी यांनी सहभाग घेतला. या जनजागृती प्रभात फेरीत मोलेदिना हायस्कूल, माउंट कार्मेल हायस्कूल, क्रिसेंट हायस्कूल, एस.एम.जोशी हिंदी हायस्कूल, अंजुमन ए इस्लाम हायस्कूल, सावित्रीबाई फुले हायस्कूल, लेडी हवाबाई हायस्कूल इ. अनेक शाळेतील 500 विद्यार्थ्यांनी बैंड पथक, झांज पथक, लेझीम पथक तसेच क्रीडाविषयक प्रात्यक्षिके सादर करून सहभाग नोंदवला. सरदार दस्तुर मुलांच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी रोड स्केटींगची प्रात्यक्षिकेही सादर केली.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात शैक्षणिक व शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील शिक्षक, क्रीडाक्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल प्राचार्य आफताब अन्वर, श्री. लकडे, श्री. आसी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम व सुरक्षा प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
8) राष्ट्रीय लोकअदालतीचे १३ सप्टेंबर रोजी आयोजन 
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आपआपसातील वाद समझोत्याने मिळविण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे शनिवार १३ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात आयोजन करण्यात येणार आहे. अधिकाधिक पक्षकारांनी या राष्ट्रीय लोकअदालतीत सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन व सचिव सोनल पाटील यांनी केले आहे.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार वाहन नुकसान भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३२० नुसार तडजोड करण्यायोग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणे, धनादेश न वटण्याची (चेक बाउन्स) प्रकरणे, जिल्ह्यातील न्यायालयातील प्रलंबित असणारी प्रकरणे तसेच बँक, वीज कंपनीची दाखल पूर्व प्रकरणे आणि मोटार वाहन कायद्याअंतर्गत येणारी प्रकरणे तडजोडी करीता ठेवण्यात आलेली आहेत.
आपली प्रकरणे लोक अदालतीमध्ये तडजोडीकरीता ठेवण्याकरिता नागरिकांनी संबंधीत न्यायालयात किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा. लोक न्यायालयामध्ये प्रकरणे ठेवण्याकरिता पक्षकार त्यांच्या वकिलांचीदेखील मदत देखील घेऊ शकतात.
लोक न्यायालयामध्ये प्रकरण मिटल्यास न्यायालयीन शुल्क नियमाप्रमाणे परत मिळू शकते. प्रकरणाचा झटपट निकाल लागतो. लोक न्यायालयाच्या निकालावर अपील  करता येत नाही. परस्पर संमतीने निकाल झाल्याने आपआपसात कटूता कमी होण्यास मदत होऊन वेळ व पैसा दोघांचीही बचत होते, अशी माहिती श्रीमती पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.
9) राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मालमत्ता करावर सुट
दाखलपूर्व प्रकरणात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मालमत्ता कराच्या प्रकरणामध्ये नागरिकांनी संपूर्ण रक्कम एकरकमी ऑनलाईन पद्धतीने भरल्यास सन 2025-26 च्या मालमत्ता करातील सामान्य कराच्या रक्कमेत ४ टक्के सुट देण्यात येणार आहे.  पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी या संधीचा लाभ घेण्याकरिता सर्वे क्र.28, संजय काळे सभागृह, दुसरा मजला, एपीएफ कार्यालयाजवळ, आकुर्डी येथे संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हा प्राधिकरणाच्यावतीने करण्यात येत आहे.
 आपले सरकार सेवा केंद्राकरिता महाविद्यालयाने अर्ज सादर करावे-निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम. सर्व महाविद्यालयांना  आपल्या महाविद्यालयात आपले सरकार सेवा केंद्रा स्थापन करण्याकरिता २० सप्टेंबर अखेर विहित नमुन्यात अर्ज सादर करावे, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिली.
जिल्ह्यातील महाविद्यालयात आपले सरकार सेवा केंद्र स्थापनेबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित कार्याशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी तहसीलदार श्वेता पवार, उच्च शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक यांच्यासह जिल्ह्यातील एकूण २१६ महाविद्यालयांनी उपस्थित होते. या कार्यशाळेत आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी महाविद्यालयांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला असून आज सुमारे दहा ते पंधरा महाविद्यालयांचे अर्ज प्राथमिक स्वरूपात प्राप्त झालेले आहेत.
10) भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाकरिता पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन  
 भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना ‘एसएसबी’ या परीक्षेच्या तयारीकरिता छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत एसएसबी अभ्यासक्रम क्रमांक ६२ चे आयोजन करण्यात येणार आहे. या संधीचा लाभ घेण्याकरिता जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे १७ सप्टेंबर रोजीपर्यंत मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मुलाखतीस येतांना सैनिक कल्याण विभागाच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर एसएसबी -६२ या अभ्यासक्रमाकरिता असलेले प्रवेशपत्र किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने देण्यात आलेल्या प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची मुदित प्रत तीन प्रतीत भरुन सोबत घेऊन यावी. अभ्यासक्रम कालावधीत प्रशिक्षणार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाणार आहे.
या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याकरिता पुढीलपैकी कोणतीही एक पात्रता इच्छुक उमेदवारांनी धारण केलीली असावी उमेदवार कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेन्स अॅकडमी एक्झामिनेशन उत्तीर्ण झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे.  एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्र ‘ए’ किंवा ‘बी’ ग्रेड मध्ये उर्तीर्ण झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीकरिता शिफारस केलेली असावी.  टेक्नीकल सॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणाली  एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबी साठी शिफारस केलेल्या यादीत नांव असावे. यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेऊन यावे. 
अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्या training.pctcnashik@gmail.com या ईमेल पत्ता व ०२५३-२४५१०३२ दुरध्वनी क्रमांक किंवा ९१५६०७३३०६ व्हॉटसअप क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.)  यांनी केले आहे.