Home Breaking News चाकण परिसर वाहतूककोंडीमुक्त करण्यासाठी मोठी कारवाई : २३१ अनधिकृत बांधकामे हटवली, अतिक्रमण...

चाकण परिसर वाहतूककोंडीमुक्त करण्यासाठी मोठी कारवाई : २३१ अनधिकृत बांधकामे हटवली, अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला गती

149
0
चाकण – औद्योगिक व व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे ठरत असलेल्या चाकण परिसरातील वाढती वाहतूककोंडी आणि नागरी समस्या सोडवण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) सह विविध शासकीय यंत्रणांनी संयुक्तरीत्या अतिक्रमण निर्मूलनाची मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत तब्बल २३१ अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे हटवण्यात आली असून, येत्या काही दिवसांत ही कारवाई आणखी सुरू राहणार आहे.
पुणे-नाशिक महामार्ग, तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्ता आणि चाकण एमआयडीसी परिसर हे वाहतुकीच्या दृष्टीने नेहमीच गजबजलेले आहेत. रस्त्याच्या कडेला झालेले अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांमुळे रस्त्यांची रुंदी कमी झाली असून, त्यातून अपघात, ट्रॅफिक जाम व नागरी त्रास वाढत होता. ही समस्या दूर करण्यासाठी १० सप्टेंबरपासून विशेष मोहीम सुरू करण्यात आली.
कारवाईचा आढावा
१० सप्टेंबर – पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण चौक ते एकतानगर (३.१ किमी) भागातील ४० अनधिकृत बांधकामे हटवली.
११ सप्टेंबर – पुणे महामार्गावरील एकतानगर ते चाकण चौक (३.१ किमी) दुसऱ्या बाजूवरील ११० अतिक्रमणे काढण्यात आली.
१२ सप्टेंबर – चाकण चौक ते तळेगाव (१.५ किमी) भागातील ४२ अनधिकृत बांधकामांवर कारवाई.
१५ सप्टेंबर – चाकण चौक ते शिक्रापूर (१.३ किमी) मार्गावरील ३९ अनधिकृत बांधकामे हटवून रस्ता मोकळा करण्यात आला.
ही कारवाई PMRDA, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), चाकण नगरपरिषद आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली. कारवाईपूर्वी अतिक्रमणधारकांना स्वखुशीने बांधकामे हटवण्याची नोटीस देण्यात आली होती, मात्र दुर्लक्ष केल्याने प्रशासनाने कडक पावले उचलली.
PMRDA चे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे आणि अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला यांनी थेट देखरेख ठेवून संबंधित प्रशासकीय यंत्रणांना कठोर निर्देश दिले. स्थानिक पोलिस बंदोबस्तासह ही कारवाई शांततेत पार पडली.
 या मोहिमेमुळे चाकण परिसरातील रस्ते मोकळे झाले असून, पुढील काळात वाहतुकीतील गतीमानता वाढून उद्योग क्षेत्रातील लॉजिस्टिक समस्यांनाही दिलासा मिळणार आहे. नागरिक व वाहनचालकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, “चाकण आता वाहतूककोंडीमुक्त होणार” अशी आशा व्यक्त केली जात आहे.