ठाणे : गोकुळाष्टमीच्या निमित्ताने दहीहंडी उत्सवात यंदा इतिहास घडला आहे. संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या मंचावर कोकण नगर पथकाने तब्बल १० थरांची मानवी पिरॅमिड रचून अभूतपूर्व असा विश्वविक्रम नोंदवला. यापूर्वी या मंचावरच ९ थरांची हंडी फोडून विक्रम झाला होता, मात्र यंदा कोकण नगर पथकाने एक थर अधिक उंच जाऊन नवा इतिहास घडवला.
या कामगिरीसाठी कोकण नगर पथकाला तब्बल २५ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले. हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या या थरारक क्षणी संपूर्ण परिसर “गोविंदा आला रे”च्या घोषणांनी दुमदुमून गेला.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गौरवोद्गार काढताना म्हटले की, “गोविंदा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. १० थरांचा हा विक्रम ही केवळ ठाण्याची नव्हे तर संपूर्ण देशाची शान आहे. खेळाडूंनी आपल्या परंपरेला आधुनिकतेची जोड देत जगभर ठसा उमटवला आहे. आजचा हा क्षण अत्यंत गौरवाचा आणि अभिमानाचा आहे.”
त्यांनी पुढे असेही नमूद केले की, “शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे साहेब यांच्या परंपरेला आम्ही पुढे नेत आहोत. गोविंदांनी केलेल्या या पराक्रमामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव अधिकच उजळून निघाले आहे.”
कोकण नगर पथकाने दाखवलेली जिद्द, एकजूट आणि शिस्त ही संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरली आहे. छोट्यापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक गोविंदाने जबाबदारीने आपली भूमिका बजावली. अपघात टाळण्यासाठी घेतलेली काळजी, शिस्तबद्ध हालचाली आणि अखंड परिश्रम यामुळेच हा विक्रम शक्य झाला.
या विक्रमामुळे महाराष्ट्रातील दहीहंडी उत्सवाला नवे पर्व लाभले असून, ठाण्यातील हा क्षण इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे.