तळेगाव दाभाडे – बहुजन सर्वांगिण विकास परिषदेच्या वतीने संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्र. ६ येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीचे आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून भावपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांपासून ते पाहुण्यांपर्यंत प्रत्येकाने आपल्या मनोगतातून स्वातंत्र्य व सामाजिक समतेसाठी दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली.
कार्यक्रमाची सुरुवात कु. तन्वी अवचिते, कु. मानसी लोखंडे आणि कु. अस्मिता संजय कदम या विद्यार्थ्यांच्या सुंदर सूत्रसंचालनाने झाली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बालमनात समाजसुधारणेच्या प्रेरणा रोवण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पत्रकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उद्योग विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष अभिजीत आपटे यांनी भूषवले. त्यांनी आपल्या भाषणात लोकमान्य टिळक हे स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व करणारे प्रेरणास्थान होते, तर अण्णा भाऊ साठे हे सामाजिक क्रांतीचे धगधगते उर्जास्रोत असल्याचे सांगितले. अण्णा भाऊंनी आपल्या लेखनातून दलित, शोषित समाजाचा आवाज बुलंद केला, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे, असे त्यांनी सांगितले.
बहुजन सर्वांगिण विकास परिषदेचे अध्यक्ष किरण साळवे यांनीही विद्यार्थ्यांना अण्णा भाऊ साठे यांचे जीवनकार्य आणि त्यांची संघर्षमय वाटचाल यांची माहिती दिली. त्यांच्या विचारांचा वारसा आजही आपल्याला सामाजिक समतेच्या दिशेने नेतो.
या कार्यक्रमाला पोलीस कर्मचारी गणेश साबळे आणि आकाश शिंदे यांची विशेष उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून या दोन महान व्यक्तिमत्त्वांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
निबंध स्पर्धेतील विजेते विद्यार्थी – प्रथम क्रमांक – कु. जान्हवी निवृत्ती शेळके द्वितीय क्रमांक – कु. क्रांती दिनेश चौरे तृतीय क्रमांक – कु. दिव्या अशोक जाधव उत्तेजनार्थ – कु. अविनाश अशोक कानडे
सर्व विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. वसुंधरा माळवदकर, सौ. प्रतिभा काळे आणि सौ. दिपमाला गायकवाड यांनी संयुक्तरित्या केले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना लोकनेत्यांच्या जीवनकार्याचा प्रेरणादायी ठेवा मिळाला. अशा कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकी वाढीस लागते, हे निश्चितच.