पुणे : महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) चा रौप्य महोत्सवी स्थापना दिवस समारंभ बाणेर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून lokउपस्थित राहिले. त्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री ॲड. आशिष शेलार, माजी मंत्री व आमदार दिलीप वळसे पाटील यांचीही विशेष उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाला एमकेसीएलचे अध्यक्ष आणि नामवंत शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर तसेच व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे हेही मंचावर उपस्थित होते. समारंभादरम्यान गेल्या २५ वर्षांत एमकेसीएलने राज्यातील डिजिटल शिक्षण, ई-लर्निंग व कौशल्यविकास क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात एमकेसीएलच्या उपक्रमांचे कौतुक करताना सांगितले की, “डिजिटल शिक्षणामुळे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत ज्ञान पोहोचले आहे. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने शिक्षणात नवनवीन प्रयोग करत विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यास सक्षम बनवले आहे.”
या रौप्य महोत्सवी सोहळ्याला शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक, विद्यार्थी, तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व तांत्रिक प्रात्यक्षिकांचे आयोजनही करण्यात आले. “एमकेसीएलच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यास मुख्यमंत्री फडणवीसांसह मान्यवरांची उपस्थिती”