Home Breaking News पुण्यात भीषण अपघात — कुंडेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या पिकअप ट्रकचा अपघात, १० महिला...

पुण्यात भीषण अपघात — कुंडेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या पिकअप ट्रकचा अपघात, १० महिला भक्तांचा मृत्यू, २७ जखमी

120
0
पुणे, १२ ऑगस्ट — पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात सोमवारी दुपारी घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. पाईटजवळील कुंडेश्वर मंदिराकडे जात असलेल्या पिकअप ट्रकचा तोल जाऊन तो सुमारे १ वाजण्याच्या सुमारास खोल दरीत कोसळला. या अपघातात १० महिला भक्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून २७ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन पुरुष आणि दोन लहान मुलांचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाईटजवळील पापळवाडी येथे गावातील भाविक कुंडेश्वर यात्रेसाठी एकत्र जमले होते. सुमारे ३५ हून अधिक भक्त मागील मालवाहू विभागात बसून पिकअप ट्रकमधून निघाले होते. मार्गातील एक तीव्र चढ चढत असताना वाहनाचा तोल सुटून ते मागे घसरले आणि खोल दरीत कोसळले. अपघात इतका भीषण होता की काही भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस व आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी पुण्यात हलवण्यात आलं आहे. घटनास्थळी अद्यापही बचावकार्य सुरू असून, वाहन दरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, प्रशासनाकडून अपघातग्रस्त कुटुंबांना मदत व सहाय्य जाहीर करण्याची शक्यता आहे. स्थानिकांनी वाहतुकीच्या सुरक्षिततेसंदर्भात उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.