पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या संकल्पनेतून एक ऐतिहासिक आणि जनतेच्या विश्वासास दृढ करणारा कार्यक्रम आज (२ ऑगस्ट) आयोजित करण्यात आला. या विशेष उपक्रमात २३१ तक्रारदारांना तब्बल ६ कोटी रुपयांचा मुद्देमाल परत देण्यात आला. या उपक्रमातून केवळ मुद्देमाल परत दिला नाही, तर जनतेच्या मनात पोलिसांबद्दलचा विश्वासही दृढ केला.
मुद्देमालाचा तपशील:
३३ तोळे सोन्याचे दागिने – अंदाजे १७ लाख रुपये
६ मोटार वाहने – ४१ लाख रुपयांची एकत्रित किंमत
५ कोटी १५ लाख रुपयांची रोख रक्कम
१६७ मोबाईल हँडसेट्स – ३० लाख रुपये किंमत
ही सर्व वस्तू तपासादरम्यान गुन्हेगारांकडून जप्त करून न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्यांच्या मूळ मालकांपर्यंत पोहोचवण्यात आली.
जनतेचा पोलिसांवर विश्वास बळकट
या कार्यक्रमात मुद्देमाल मिळालेल्या अनेक नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, “अशा उपक्रमांमुळे जनतेचा पोलिसांवरील विश्वास अधिकच दृढ होतो. पोलिसांचा हा प्रयत्न खरोखरच स्तुत्य आहे.”
सायबर पोलिसांची विशेष कामगिरी
सायबर पोलीस स्टेशनच्या तपासामुळे तब्बल ५ कोटी ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आला. याशिवाय CEIR पोर्टलवर हरवलेले मोबाईल्स नोंदवल्यानंतर पोलिसांनी १६७ मोबाईल्स शोधून तक्रारदारांना परत दिले.
सायबर फसवणुकीबाबत जनजागृती
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सायबर फसवणुकीबाबत उपस्थितांना सखोल माहिती दिली. ‘डिजिटल अरेस्ट’, ‘डीप फेक’ अशा नव्या फसवणुकीच्या प्रकारांची माहिती देत त्यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले. “भीती व माहितीअभावी फसवणुकीला बळी पडू नका, पोलिसांशी संपर्क करा,” असे ते म्हणाले.
नवीन फौजदारी कायद्यांमुळे जलद निर्णय
नवीन फौजदारी कायद्यांतर्गत मुद्देमाल परत करण्याची तरतूद प्रभावीपणे वापरली जात असून त्यामुळे प्रकरणे वेगाने निकाली निघत आहेत. हा उपक्रम त्याचे उत्तम उदाहरण ठरतो.
कार्यक्रमात मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, विविध पोलीस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, व २५० नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू बांगर यांनी केले तर आभार प्रदर्शन पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी केले.