मावळ, उर्से (पुणे) – अंमली पदार्थ विक्रीवर नियंत्रण मिळवण्याच्या उद्देशाने शिरगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने एक मोठी कारवाई करत गांजाची तस्करी करणाऱ्या इसाक गणीभाई शेख (वय ५२, रा. उर्से, मावळ) याला अटक केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात पिंपरी भाटनगर येथील सोनु उर्फ सागर या आरोपीचा देखील समावेश असून त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल गोविंद डोके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. आरोपी इसाक शेख याच्या ताब्यात तब्बल ३८८ ग्रॅम गांजा (किंमत – १९,४०० रुपये), १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन, ५० हजार रुपये किमतीची दुचाकी आणि ४६५ रुपये रोख रक्कम, असा एकूण ८१ हजार ८६५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
ही कारवाई केवळ इसाक शेखवर थांबली नसून, तपासात उघड झालं की त्याने हा गांजा सोनु उर्फ सागर (रा. भाटनगर, पिंपरी) याच्याकडून विक्रीसाठी आणला होता. त्यामुळे सागर याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या प्रकरणामुळे मावळ परिसरात अंमली पदार्थांची विक्री किती व्यापक स्वरूपात सुरू आहे, हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. शिरगाव पोलिसांनी ही कारवाई करत गांजाच्या तस्करीच्या साखळीला जोरदार हादरा दिला आहे.
पोलीस प्रशासनाकडून सतर्कता वाढवली या घटनेनंतर शिरगाव पोलिसांनी मावळ परिसरातील संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढवली असून, अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात जोरदार मोहिम हाती घेण्याचे संकेत दिले आहेत.