पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने नागरी आरोग्य पोषण दिनानिमित्त काळेवाडी येथील न्यू जिजामाता रुग्णालयातर्फे आयोजित केलेल्या मोफत महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. आरोग्यसेवा नागरिकांच्या दारी पोहोचवण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या उपक्रमात २०० हून अधिक नागरिकांनी विविध तपासण्या व उपचारांचा लाभ घेतला.
या शिबिराचे उद्घाटन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. अलवी नासेर, डॉ. शीतल शिंदे, डॉ. जतीन होतवानी, बालरोगतज्ज्ञ डॉ. स्वाती विसपुते, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुप्रिया पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्त्या संगीता कोकणे, अनिता पांचाळ, जिजामाता रुग्णालय व काळेवाडी दवाखान्याचे कर्मचारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या शिबिरात नागरिकांसाठी वजन, उंची, बीएमआय, रक्त तपासण्या, क्ष-किरण, थुंकी तपासणी, गरोदर मातांची तपासणी, लसीकरण, तसेच ‘आभा’ व ‘आयुष्मान’ कार्ड नोंदणी यांसारख्या महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. याशिवाय बालरोग, स्त्रीरोग, नेत्ररोग, दंतरोग, नाक-कान-घसा तज्ज्ञ आणि फिजीशियन डॉक्टरांचे मार्गदर्शन नागरिकांना मिळाले. तपासणी नंतर आवश्यक औषधे मोफत वाटप करण्यात आली.
दरम्यान, नागरी आरोग्य पोषण दिनाच्या अनुषंगाने शहरातील विविध भागांत अशा आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन सातत्याने केले जात असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. नागरिकांनी या उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.
मान्यवरांचे विचार
“पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या दारी आरोग्यसेवा पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. काळेवाडीत झालेल्या शिबिराला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हे या उपक्रमाच्या यशाचे प्रतीक आहे.” – विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
“मोफत महाआरोग्य शिबिरांमुळे नागरिकांना विविध तपासण्या व उपचार एकाच छताखाली उपलब्ध होत आहेत. आजाराचे लवकर निदान होऊन योग्य उपचार शक्य होत आहेत.” – डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका
“काळेवाडीत मोफत महाआरोग्य शिबिर यशस्वी – २०० हून अधिक नागरिकांनी घेतला तपासण्या व उपचारांचा लाभ”