Home Breaking News आमदाराचा पुतण्या असल्याचा धाक दाखवत वाहतूक पोलिसांना दमबाजी; चाकणमध्ये फॉर्च्यूनर चालकाचा उद्दामपणा

आमदाराचा पुतण्या असल्याचा धाक दाखवत वाहतूक पोलिसांना दमबाजी; चाकणमध्ये फॉर्च्यूनर चालकाचा उद्दामपणा

198
0
चाकण : “मी आमदाराचा पुतण्या आहे, मला कोणी थांबवू शकत नाही,” असे उद्दाम वक्तव्य करत फॉर्च्यूनर कार चालक मयूर काळे याने चाकणमधील माणिक चौकात वाहतूक पोलिसांशी उघड उघड हुज्जत घातली. ‘नो एन्ट्री’ असलेल्या मार्गावरून जाण्याचा हट्ट धरत त्याने केवळ नियमांची पायमल्ली केली नाही, तर सरकारी कर्मचाऱ्यांना धमकावत असभ्य भाषेत वागणूक दिली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ही घटना रविवार, ३ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता घडली. याप्रकरणी पोलीस हवालदार लक्ष्मण आनाजी सांगडे यांनी चाकण पोलीस ठाण्यात मयूर काळे याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवून पुढील चौकशी सुरू केली आहे.
 “मी आमदाराचा पुतण्या आहे” – नियमांना हरताळ
मिळालेल्या माहितीनुसार, हवालदार सांगडे हे माणिक चौकात वाहतूक नियंत्रण करत असताना काळे याने फॉर्च्यूनर (MH14/MK9797) कार घेऊन नो एन्ट्री मार्गात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी नियम सांगत थांबवले असता, तो संतापला व म्हणाला, “मी आमदाराचा पुतण्या आहे, मला कायदा सांगू नका!”
 सरकारी कर्मचाऱ्यांशी हुज्जत
पोलिसांच्या विनंतीनंतरही मयूर काळे ऐकण्यास तयार नव्हता. त्याने बॅरिकेड्ससमोर गाडी थांबवून पोलिसांवर “तुम्ही काही करू शकत नाही” असे उघडपणे उच्चार केले. शिवाय शिवीगाळ करत दमदाटीही केली. या वादामुळे काही वेळ वाहतूकही विस्कळीत झाली होती.
 कायद्यासमोर सर्व समान
या प्रकरणामुळे कायद्यापेक्षा वरचढ होण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी योग्य तो संदेश दिला आहे. पोलिसांनी याप्रकरणी त्वरित गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली आहे. पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले की, कोणताही राजकीय संबंध वा ओळख कायद्यापेक्षा मोठी नाही.