पुणे शहरात अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, वाहनचालकांची बेफिकिरी आणि भरधाव वेगातील वाहने जीवघेणी ठरत आहेत. रविवारी (२२ जून २०२५) पुण्यातील वडगाव उड्डाणपुलाजवळ आणि विमाननगरमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
वडगाव उड्डाणपुलावर दुचाकीला ट्रकची जोरदार धडक – २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू
वडगाव उड्डाणपुलाजवळ पहाटे सव्वापाचच्या सुमारास एका भरधाव ट्रकने मागून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात किरण पवार (वय २५, रा. कर्वेनगर) याचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार जयप्रकाश किरदत्त (वय २५) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला, मात्र सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेने त्याचा पाठलाग करत रात्री उशिरा अटक केली. अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव महंतेश श्रीकांत अंदोडगी (वय ३७, रा. विजयपूर, कर्नाटक) असे आहे.
या अपघातात ट्रकने दोन चारचाकी वाहनांनाही धडक दिल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक मालुस करत आहेत.
विमाननगरमध्ये रिक्षाची धडक – पादचारी मन्सूर आलम यांचा मृत्यू
एकीकडे वडगाव उड्डाणपुलाजवळ ट्रकने थैमान घातले, तर दुसरीकडे विमाननगर परिसरात रिक्षाच्या धडकेत ५४ वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू झाला. मन्सूर अन्वर आलम (रा. ससून क्वार्टर्स, सोमवार पेठ) हे शनिवारी रात्री विमाननगर भागातून चालत जात असताना सिंबायोसिस कॉलेज गेट नंबर १ समोर भरधाव रिक्षाने त्यांना उडवले.
मन्सूर यांचा मुलगा मोहम्मद रिहान आलम यांनी विमाननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून रिक्षाचालक जालिंदर बबन शेळके (वय ५७, रा. आळंदी रोड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार धेंडे करत आहेत.
नागरिकांच्या सुरक्षेला कोण विचारणार?
या दोन घटनांनी पुन्हा एकदा पुण्यातील रस्त्यांवरील वाहतूक सुरक्षेचा आणि प्रशासनाच्या दक्षतेचा प्रश्न उपस्थित केला आहे. अपघातांच्या घटना वारंवार घडत असूनही ट्राफिक नियमनावर ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. अपघातानंतरच नियम लागू न करता तत्पूर्व नियोजन आणि रोड सेफ्टी मोहीम हाती घेणं आवश्यक आहे.
मागण्या काय?
वडगाव उड्डाणपुलावर सीसीटीव्ही आणि स्पीड गन त्वरित बसवाव्यात
विमाननगरसारख्या गर्दीच्या परिसरात झेब्रा क्रॉसिंग आणि स्पीड ब्रेकरची आवश्यकता
रस्त्यांवर रात्रीच्या वेळी वाहतूक पोलिसांची अधिक गस्त
दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्गांची अंमलबजावणी