Home Breaking News लोणावळ्यातील दुचाकी-पिकअप भीषण अपघात; २४ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू! मावळ तालुक्यातील वाकसई...

लोणावळ्यातील दुचाकी-पिकअप भीषण अपघात; २४ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू! मावळ तालुक्यातील वाकसई गावावर शोककळा; स्थानिकांमध्ये हळहळ

61
0
लोणावळा | प्रतिनिधी: जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी दुपारी एक हृदयद्रावक अपघात घडला. खंडाळा येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राजवळील पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगात असलेल्या दुचाकीला समोरून येणाऱ्या भाजी व फळांची वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनाची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात वाकसई येथील २४ वर्षीय युवक सौरव सुखदेव वाघ याचा जागीच मृत्यू झाला.
ही दुर्घटना गुरुवारी दुपारी सुमारे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. दुचाकीचा वेग अधिक असल्याने आणि रस्त्यावर अचानक समोरून पिकअप आल्याने सौरवला गाडीचा ताबा राखता आला नाही, आणि भीषण धडक होऊन त्याचा मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती मिळते.
सौरव वाघ हा वाकसई चाळ येथील रहिवासी असून, त्याचे कुटुंब एक मेहनती, प्रतिष्ठित आणि सर्वांशी चांगले संबंध ठेवणारे आहे. सौरवच्या अकस्मात निधनाने गावात शोककळा पसरली आहे. अनेक तरुण मित्र मंडळी, स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली.
अपघाताची माहिती मिळताच लोणावळा शहर वाहतूक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला हलवली. जखमी अवस्थेत सौरवला रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या अपघातामुळे नागरिकांमध्ये रस्त्यावरील वेगमर्यादा, वाहनांची अयोग्य ओव्हरटेकिंग, आणि अपुऱ्या रस्ते सुरक्षेची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. या मार्गावर याआधीही अनेक अपघात घडले असून, स्थानिकांनी प्रशासनाकडे रस्ते सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
पोलीस अधिकाऱ्यांकडून प्राथमिक चौकशी सुरू असून, पिकअपचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.