पिंपरी-चिंचवड :- पिंपरी-चिंचवड शहराच्या पर्यटन क्षेत्राला नवे बळ देणारा आणि पर्यावरणपूरक संकल्पनांना चालना देणारा डुडुळगाव येथील “इको टुरिझम पार्क” प्रकल्प आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी या प्रकल्पासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या वाटचालीला गती मिळण्याची शक्यता बळावली आहे.
पर्यटन विकासाच्या दिशेने ठोस पाऊल
“इको टुरिझम पार्क” प्रकल्पासाठी सुमारे 2.62 कोटी रुपयांचा निधी लागणार असून, जिल्हा वार्षिक योजना 2025-26 अंतर्गत प्रस्तावित हा निधी लवकरच मंजूर होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पात निसर्ग पर्यटन, जैवविविधता साक्षरता, वनीकरण, पर्यावरण शिक्षण यांसारख्या उपक्रमांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींना आणि स्थानिक नागरिकांना नवे पर्यटन केंद्र उपलब्ध होणार आहे.
वनमंत्री व अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक
पुण्यात झालेल्या बैठकीत भाजपा आमदार महेश लांडगे यांनी विविध मागण्या मांडल्या. यामध्ये – डुडुळगाव इको टुरिझम पार्कसाठी निधी, आण्णाभाऊ साठेनगर वसाहतीसाठी पायाभूत सुविधा, मंजूर विकास योजनेतील रस्त्यांसाठी भूखंड हस्तांतरण.
या मागण्यांचा समावेश होता. या वेळी महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, वनविभागाच्या शोमिता विश्वास, तसेच नरेश झुरमुरे, विवेक खाडेकर, महादेव मोहिते हे अधिकारी उपस्थित होते.
शहराच्या समृद्धतेसाठी निर्णय
वनमंत्री गणेश नाईक यांनी पुढील १५ दिवसांत प्रस्तावांवर निर्णय घेण्यात येईल, तसेच अण्णाभाऊ साठेनगर वसाहतीसाठी वन विभाग अडथळा ठरणार नाही, असे स्पष्ट आश्वासन दिले. यामुळे वन विभागाशी संबंधित प्रलंबित विकास प्रकल्पांनाही आता गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
स्थानिकांचा उत्साह आणि अपेक्षा
हा प्रकल्प प्रत्यक्षात आला तर डुडुळगावसह पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांना निसर्गाच्या सानिध्यात एक नवे पर्यटन स्थळ लाभणार आहे. त्याचबरोबर पर्यावरण साक्षरता, विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक शिक्षण, वनीकरण प्रकल्पांना चालना, आणि स्थानिक रोजगार निर्मिती यासारख्या अनेक सकारात्मक बाबींचा फायदा होणार आहे.
“वन विभागाशी संबंधित कामांना गती देण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. ‘इको टुरिझम पार्क’सह अन्य महत्त्वाच्या प्रस्तावांना निधी व परवानग्या मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक त्या सर्व बैठकांना उपस्थित राहत आहे.”