Home Breaking News “झापूक झुपूक” ते यशाचा शिखर! सूरज चव्हाणचा प्रवास सोशल मीडियावरून बिग बॉसपर्यंत,...

“झापूक झुपूक” ते यशाचा शिखर! सूरज चव्हाणचा प्रवास सोशल मीडियावरून बिग बॉसपर्यंत, आता रूपेरी पडद्यावर दमदार हजेरी

66
0
मुंबई | सोशल मीडियाच्या ताकदीवर किती मोठे परिवर्तन घडू शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे सूरज चव्हाण. एक काळ होता, जेव्हा सूरज हा खेड्यात राहणारा, शिक्षणात फारसे पुढे नसलेला आणि अत्यंत साधा-भोळा मुलगा होता. पण टिक टॉकवरील व्हिडिओंमुळे तो स्टार झाला, आणि त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढू लागली.
 TikTok पासून सुरुवात… पण शिक्षणाअभावी आलेल्या अडचणी
टिक टॉकवरचे मजेशीर व्हिडिओ आणि हटके अंदाज यामुळे सूरज चव्हाणने प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्यातून त्याला चांगली कमाईही व्हायची, मात्र शिक्षणाचा अभाव आणि अनुभव नसल्यामुळे त्याची अनेकदा फसवणूकही झाली. जेव्हा TikTok बंद झाले, तेव्हा सूरजचे आयुष्य पुन्हा एकदा धुसर झाले.
बिग बॉस मराठीमधून संधी आणि नशिबाचा खेळ
पण नशीब एक संधी शोधत असतेच! आणि ती संधी सूरजला बिग बॉस मराठीच्या स्पर्धक म्हणून मिळाली. सुरुवातीला प्रेक्षकांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही, काहींनी नाक मुरडले, पण सूरजच्या प्रामाणिक स्वभावाने, बोलक्या आणि विनोदी शैलीने प्रेक्षकांचे मन जिंकले. त्याच्या खास “झापूक झुपूक” अशा शब्दांनी तो घराघरात पोहोचला.
ट्रॉफीवर सूरजचं नाव कोरलं
शोमध्ये इंडियन आयडल विजेता अभिजीत सावंत यांसारखा लोकप्रिय आणि मजबूत स्पर्धक असतानाही, सूरजने सर्वांना मागे टाकत बिग बॉस मराठीच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. हा क्षण सूरजसाठी केवळ यशाचा नव्हे, तर एक नवीन आयुष्य सुरू होण्याचा होता.
“झापूक झुपूक” – सिनेमाच्या प्रवासाला सुरुवात
बिग बॉसच्या अंतिम सोहळ्यात दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरजसोबत सिनेमा बनवण्याची घोषणा केली होती. आणि तोच सूरजचा प्रसिद्ध शब्द “झापूक झुपूक” सिनेमाचे शीर्षक बनला. प्रेक्षकांमध्ये सिनेमा पाहण्यासाठी उत्सुकता होती आणि प्रमोशनही जोमात करण्यात आले.
सिनेमाला संमिश्र प्रतिसाद, पण सूरजच्या अभिनयाची दाद
सिनेमाला दिग्दर्शकाच्या अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नसला तरी, सूरज चव्हाणच्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून विशेष कौतुक करण्यात आलं. एक नवखा कलाकार असूनही त्याने प्रामाणिकपणे भूमिका साकारली, हे अनेक समीक्षकांनीही मान्य केलं.
प्रसिद्धीच्या झगमगाटातही साधेपणा राखणारा सूरज
आजही सूरज चव्हाण आपल्या साधेपणामुळे आणि दिलखुलास स्वभावामुळे ओळखला जातो. त्याचा प्रवास म्हणजे सामान्य माणसाचा असामान्य संघर्ष – सोशल मीडियावरून छोट्या पडद्यावर, आणि आता सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर!