Home Breaking News जावेद हबीब टीमकडून तळेगाव वानप्रस्थाश्रमातील वृद्धांसाठी ‘सौंदर्य सेवा’; आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर फुलला हास्याचा...

जावेद हबीब टीमकडून तळेगाव वानप्रस्थाश्रमातील वृद्धांसाठी ‘सौंदर्य सेवा’; आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर फुलला हास्याचा बहार

70
0
तळेगाव दाभाडे – “वृद्धत्व म्हणजे संधींचा अंत नव्हे, नव्या आत्मसन्मानाची सुरुवात” या भावनेतून केस कर्तनालय क्षेत्रातील आघाडीची संस्था जावेद हबीब यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीचा एक स्तुत्य आविष्कार घडवत, तळेगाव स्टेशन येथील वानप्रस्थाश्रमातील वृद्ध आजी-आजोबांना आनंदाचा अनोखा अनुभव दिला. सौंदर्य सेवा फक्त तरुणांसाठीच नव्हे तर जेष्ठांसाठीही असू शकते, हे या उपक्रमाने सिद्ध केले.
या सेवाभावी उपक्रमात जावेद हबीबची टीम वृद्धाश्रमात पोहोचली. त्यांनी झाडांच्या सावलीत खुर्च्या मांडल्या आणि हळुवारपणे प्रत्येक आजी-आजोबांना त्या खुर्च्यांवर बसवले. विशेष काळजी घेत त्यांची दाढी केली, केस कापले, अगदी काही आजोबांच्या विनंतीवरून “तुळतुळीत गोटा” देखील केला. वृद्धांच्या पायांची वाढलेली नखे कापण्यात आली. विशेषतः पायाच्या अंगठ्यांची जाड नखे कापताना कर्मचाऱ्यांची सेवा आणि संवेदनशीलता दिसून आली.
स्त्री कर्मचाऱ्यांनी आजींना कोमलतेने फेशियल सेवा दिली. आयब्रोज आणि सुंदर हेअर स्टाईल्समुळे आजींच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसून आलं. आरशात स्वतःचा तजेलदार चेहरा पाहून प्रत्येक आजी-आजोबाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य झळकत होते. त्या क्षणाने वानप्रस्थाश्रमात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.
या उपक्रमाचे सूत्रधार उज्वला मेश्राम यांनी व्यक्त केलेल्या भावना थेट काळजाला भिडणाऱ्या होत्या.
“मी लहान असताना माझे आई-वडील लवकर गेले. मला त्यांचा चेहराही पाहायला मिळाला नाही. माझा संपूर्ण सांभाळ माझ्या आजी-आजोबांनी केला. त्यामुळे त्यांच्या प्रती मी कायम ऋणी आहे. आजच्या यशस्वी जीवनात त्यांचेच योगदान आहे. म्हणून वृद्धांसाठी काही तरी करायचं हे मी ठरवलं होतं.”
वानप्रस्थाश्रमातील विश्वस्तांनी केला गौरव:
या सेवाकार्यातील सामाजिक भान आणि संवेदनशीलतेची दखल घेत, वानप्रस्थाश्रमाचे विश्वस्त सुरेश साखवळकर यांनी उज्वला मेश्राम यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. सौ. उर्मिला छाजेड यांनी देखील त्यांचे विशेष आभार मानले.
स्थानिकांच्या प्रतिक्रिया:
स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. त्यांच्या मते, अशा प्रकारचे उपक्रम वृद्धांच्या मानसिक आरोग्यासाठी तसेच समाजात वृद्धांविषयी सकारात्मक दृष्टिकोन वाढविण्यासाठी अत्यंत गरजेचे आहेत. या सेवेमुळे “वृद्धत्वाच्या झाडाला नवसंजीवनी” मिळाल्याचे चित्र होते.
उपक्रमाचा ठसा:
या एकदिवसीय सौंदर्यसेवा उपक्रमामुळे वानप्रस्थाश्रमात एक वेगळीच उत्सवाची आणि नवचैतन्याची लाट पसरली. वृद्धत्व हे केवळ शरीराचं नसून मनाचंही असतं हे दाखवून देत, जावेद हबीबच्या टीमने जिव्हाळ्याच्या आणि माणुसकीच्या भावनेने मन जिंकून घेतलं.