इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले कुंडमळा हे पर्यटनस्थळ दरवर्षी पावसाळ्यात निसर्गप्रेमी पर्यटकांनी गजबजून जाते. निसर्गाचा अप्रतिम सौंदर्य, वाहते झरे, कुंड आणि बंधाऱ्यावरून वाहणारे पाणी पाहण्यासाठी येथे पर्यटकांची मोठी गर्दी होते. मात्र, याच निसर्गसौंदर्याच्या आकर्षणामुळे गेल्या पाच वर्षांत अनेक पर्यटकांनी जीव गमावले आहेत. या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे पोलिसांनी कुंडमळा येथे पर्यटकांसाठी नियमावली लागू केली आहे, असे माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायन्नावर यांनी दिली.
जीवितहानी टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल
पावसाळी पर्यटनाची धूम सुरू झाली असताना कुंडमळा परिसरात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. “पाण्यातील आनंद जीवावर बेतू नये, यासाठी ही खबरदारी,” असे रायन्नावर म्हणाले. अनेक वेळा उत्साहात पाण्यात उडी मारणे, निसर्गाच्या प्रवाहाकडे दुर्लक्ष करणे आणि योग्य मार्गदर्शनाअभावी दुर्घटना घडतात, त्यामुळेच ही नियमावली तयार करण्यात आली आहे.

अशी आहे नवी नियमावली:
-
शनिवार, रविवार आणि सुट्ट्यांमध्ये पोलिस बंदोबस्त अनिवार्य
-
गावकरी वगळता इतर वाहनांसाठी प्रवेशावर निर्बंध
-
हॉकर्स झोन बंदी – कोणतेही अनधिकृत खाद्यगृह, फेरीवाले परवानगीशिवाय बंद
-
आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाची तत्पर व्यवस्था
-
वन्यजीव रक्षक संस्था, स्वयंसेवी संस्था यांचे सहकार्य
-
कुंडमळा परिसरात पर्यटकांसाठी निश्चित वेळमर्यादा लागू
-
पाण्याजवळ खबरदारीचे फलक, चेतावणी चिन्हे अनिवार्य
-
अत्यंत पाण्याचा प्रवाह असताना परिसर पूर्णतः बंद ठेवण्यात येणार
पर्यटन आणि सुरक्षा यांचा समतोल
पोलीस निरीक्षक रायन्नावर यांनी स्पष्ट केले की, “पर्यटनाला बंदी नाही, पण सुरक्षेला प्राधान्य आहे. निसर्गाचा आनंद घेताना जीवितहानी होऊ नये, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी पोलिसांशी सहकार्य करावे आणि नियमांचे पालन करावे.”
सामाजिक संस्थांचे सहकार्य
वन्यजीव रक्षक संस्था, स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहभागाने या परिसरात सुरक्षिततेचे जाळे तयार करण्यात आले आहे. स्थानिक ग्रामस्थांनाही यामध्ये सहभागी करून घेण्यात येत आहे, जेणेकरून पर्यटन आणि सुरक्षितता या दोन्हीचा योग्य समतोल राखता येईल.
जनतेसाठी विशेष आवाहन
-
पाण्यात उडी मारण्याआधी स्थानिकांच्या सूचनांचा आदर करा
-
अलार्म, चेतावणी फलक आणि पोलिसांच्या सूचनांचे काटेकोर पालन करा
-
अपघात झाल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधा