Home Breaking News आमदार अमित गोरखे, आमदार शंकर जगताप यांनी केले पालखीचे सारथ्य

आमदार अमित गोरखे, आमदार शंकर जगताप यांनी केले पालखीचे सारथ्य

50
0
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पिंपरी-चिंचवडमध्ये जल्लोषात स्वागत
आमदार अमित गोरखे, आमदार शंकर जगताप  यांनी केले पालखीचे सारथ्य
पिंपरी-चिंचवड, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या ३४० व्या पालखी सोहळ्याचे पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात स्वागत करण्यात आले. पालखीचे आगमन झाल्यानंतर शहरात हरिनामाच्या गजरात आणि टाळ-मृदुंगाच्या तालात वातावरण भक्तिमय झाले. या पालखी सोहळ्यात भाजपचे आमदार श्री.अमित गोरखे चिंचवडचे आमदार श्री. शंकर जगताप  यांनी पालखी रथाचे सारथ्य करत श्रद्धेचा अनुभव दिला.
या प्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना आमदार अमित गोरखे म्हणाले, “संत तुकाराम महाराजांची पालखी ही केवळ वारकऱ्यांची नव्हे तर समस्त समाजासाठी एक अध्यात्मिक ऊर्जा आहे. “वारी ही श्रद्धा, संयम आणि सामूहिक साधनेचा प्रतीक आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाने यामध्ये सहभाग घेतला, यामुळे शहराची संस्कृती आणि परंपरेवरील निष्ठा अधिक दृढ झाली आहे.”
भक्ती-शक्ती चौकात महापालिकेच्या वतीने आयोजित स्वागत सोहळ्यात पालखीचे दिमाखदार स्वागत करण्यात आले. महापालिका प्रशासन आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोहळ्याच्या स्वागतासाठी उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते.
पालखीच्या आगमनावेळी पावसानेही आपली उपस्थिती नोंदवली. हजारो वारकरी टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात आकुर्डी मुक्कामी मार्गस्थ झाले.
वारकऱ्यांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, आरोग्य शिबिरे, पाणी व फराळ व्यवस्था, तसेच निवाऱ्याची सोय करण्यात आली. शहरातील नागरिकांनी या सेवाकार्यात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. शिस्तबद्ध व्यवस्थेचे वारकऱ्यांकडून मनापासून कौतुक करण्यात आले.