Home Breaking News खोपोलीतील सुभाषनगरात दरडप्रवण भागात भव्य मॉकड्रील; सर्व यंत्रणा सज्ज, नागरिकांमध्ये निर्माण झाला...

खोपोलीतील सुभाषनगरात दरडप्रवण भागात भव्य मॉकड्रील; सर्व यंत्रणा सज्ज, नागरिकांमध्ये निर्माण झाला विश्वास

75
0

प्रतिनिधी – श्रावणी कामत | खोपोली | दि. २९ मे : रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरात दरडप्रवण सुभाषनगर भागात आपत्ती व्यवस्थापनाची वास्तविक परिस्थितीतील सज्जता तपासण्यासाठी एक भव्य आणि प्रभावी मॉकड्रील २८ मे रोजी आयोजित करण्यात आली. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली, खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या आदेशाने हे मॉकड्रील यशस्वीपणे पार पडले.

पावसाच्या धोधो सरीत यंत्रणांची तत्परता पाहून नागरिक थक्क!

दुपारी ३:०५ वाजता अलर्ट कॉल मिळताच, अवघ्या पाच मिनिटांत सर्वच यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी, आणि जवान आवश्यक साधनांसह सुभाषनगरमध्ये दाखल झाले. मुसळधार पावसात आणि जोरदार वाऱ्यातही त्यांची कार्यक्षमता आणि एकजूट पाहून स्थानिक नागरिक अचंबित झाले.

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज :

या मॉकड्रीलमध्ये आपदा मित्र यंत्रणेचे नोडल ऑफिसर एम. के. म्हात्रे, महसूल विभागाचे मनोज पवार, उपमुख्याधिकारी रणजीत पवार, पोलिस निरीक्षक शितल राऊत, अग्निशमन अधिकारी मोहन मोरे, डॉ. संगीता वानखेडे, म.रा.वि.म., वन विभाग, मंडळ अधिकारी भरत सावंत, आशा वर्कर्स, आणि अनेक सामाजिक संस्था व स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

नागरिकांना दिल्या सुरक्षिततेच्या सूचना :

या मॉकड्रील दरम्यान, नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत वावरण्याच्या सूचना, योग्य उपाययोजना आणि संपर्क यंत्रणा यांची माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये आपत्ती काळातील भीती कमी होऊन विश्वासाचे वातावरण निर्माण झाले.

मुख्य उद्दिष्ट – सज्जतेची चाचणी व जनजागृती :

या मॉकड्रीलचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे प्रशासन आणि यंत्रणांची समन्वय क्षमता तपासणे आणि नागरिकांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती निर्माण करणे हे होते. विशेषतः दरडप्रवण भागातील नागरिकांसाठी हे मॉकड्रील फार महत्त्वाचे ठरले.

 या मॉकड्रीलने रायगड जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची सज्जता आणि तत्परता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. अशा उपक्रमांमुळे आपत्तीच्या प्रसंगी होणारी जीवित आणि मालमत्तेची हानी टाळता येणार आहे.