पिंपरी, पुणे | प्रतिनिधी श्रावणी कामत :- भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील शैक्षणिक, सांस्कृतिक आणि जागतिक करिअर संधींच्या नवीन पर्वाची सुरुवात पिंपरी चिंचवड विद्यापीठाने घडवून आणली आहे. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) च्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या पिंपरी चिंचवड विद्यापीठाने (पीसीयू) कोरियातील आघाडीच्या सॅमयुंग विद्यापीठ आणि कांगओन नॅशनल युनिव्हर्सिटी बरोबर शिक्षण, संशोधन आणि रोजगाराच्या क्षेत्रात सामंजस्य करार केला आहे.
हा करार केवळ दोन विद्यापीठांमधील एक औपचारिक करार न राहता, भारत व कोरिया यांच्यातील बंधनं अधिक दृढ करणारा मैलाचा दगड ठरणार आहे, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला.
शिक्षण आणि सांस्कृतिक समृद्धीसाठी एक नवा अध्याय
कोरियन टुरिझम ऑर्गनायझेशन (KTO) च्या सहकार्याने पुण्यात आयोजित केलेल्या कोरियन एज्यु टूर रोड शो मध्ये या कराराचे औपचारिक जाहीर करण्यात आले. यावेळी KTO इंडिया क्षेत्रीय संचालक मायॉंग किल युन, महाराष्ट्र शासनाचे उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. शैलेश देवळलणकर, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई तसेच १२५ हून अधिक शाळा-महाविद्यालयांचे मुख्याध्यापक व प्राचार्य उपस्थित होते.
जागतिक संधींच्या दारात भारत
कार्यक्रमात बोलताना मायॉंग किल युन यांनी सांगितले की, कोरिया आता केवळ के-पॉप, के-ड्रामा पुरता मर्यादित राहिलेला नाही तर शिक्षण, नवोन्मेष आणि जागतिक करिअर संधींच्या दृष्टीनेही आघाडीवर आहे. भारतातील विद्यार्थ्यांना कोरियाशी अधिक खोल संबंध निर्माण करता यावेत यासाठी आम्ही मार्गदर्शन करत आहोत, असे त्यांनी सांगितले.
शिक्षण व उद्योगासाठी महाराष्ट्र सरकारचा पुढाकार
डॉ. शैलेश देवळलणकर यांनीही कोरियन शैक्षणिक संधींचे महत्त्व पटवून देत सांगितले की, महाराष्ट्र सरकार विद्यार्थ्यांच्या देवाणघेवाण कार्यक्रमांना, आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप्सना आणि शैक्षणिक प्रकल्पांना आवश्यक ते सहकार्य करण्यास सदैव तयार आहे.
त्यांनी “स्टडी इन कोरिया” या उपक्रमांतर्गत भारतात कोरियन विद्यापीठ स्थापन होण्याच्या शक्यतेचे संकेतही दिले.
जागतिक शैक्षणिक दृष्टीकोन
डॉ. गिरीश देसाई यांनी यावेळी नमूद केले की, कोरियातील शैक्षणिक संस्थांशी केलेल्या करारांमुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण, रोजगार संधी आणि संशोधनाचा मार्ग खुले होईल. सांस्कृतिक अनुभव, शैक्षणिक देवाण-घेवाण आणि अभ्यास दौऱ्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक व्यासपीठावर स्वतःला सिद्ध करता येईल.
पीसीईटी नेतृत्वाचे विशेष योगदान
या ऐतिहासिक घडामोडीत पीसीईटी अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विशेष योगदान दिले. त्यांनी उपस्थित सर्व प्राचार्य व मुख्याध्यापकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे ठळक मुद्दे :
-
भारत व कोरिया यांच्यात शैक्षणिक सहकार्याचा दुवा तयार
-
जागतिक स्तरावरील शैक्षणिक व रोजगाराच्या संधी
-
महाराष्ट्र सरकारकडून शैक्षणिक देवाण-घेवाण उपक्रमांना पाठिंबा
-
सांस्कृतिक देवाण-घेवाण व स्टडी इन कोरिया उपक्रमावर भर
-
भविष्यात भारतात कोरियन विद्यापीठ स्थापन होण्याची शक्यता