पुणे, १९ एप्रिल २०२५ –कोंढवा परिसरात पहाटेच्या वेळी वाहनांची तोडफोड करत दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारी टोळक्याचा गुन्हे शाखा युनिट ५ ने पर्दाफाश करत चार प्रमुख आरोपींना अटक केली असून, त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे. या गुन्ह्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेचा तपशील
दि. १६ एप्रिल २०२५ रोजी पहाटे अनोळखी इसमांनी दुचाकीवरून येऊन अश्रफनगर व लक्ष्मीनगर, कोंढवा (बा.) परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहनांची तोडफोड केली. यामध्ये ९ चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले, तर दुचाकी, रिक्षा व इतर वाहनांचेही नुकसान करण्यात आले. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
कोंढवा पोलीस स्टेशन येथे याप्रकरणी गु.र.नं. ३१७/२०२५ अन्वये खालील कायद्यांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता:
-
भा.दं.वि. कलम ३२४
-
हत्यार कायदा कलम ४(२५)
-
महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५
-
क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ३ व ७
गुन्हे शाखेचा समांतर तपास आणि माहितीवरून कारवाई
सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून आरोपी अज्ञात असल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट ५ यांना समांतर तपासाची जबाबदारी देण्यात आली. प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो. फौजदार राजस शेख आणि पोलीस अंमलदार पृथ्वीराज पांडुळे यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चौकशी सुरु केली.
गुलटेकडी येथून चौघे आरोपी ताब्यात
मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून गुन्ह्यात सहभागी आरोपींची नावे पुढीलप्रमाणे निष्पन्न झाली:
-
नवाज अजीज शेख (वय २०)
-
अल्फाज मुर्तजा बागवान (वय २०)
-
यश विजय सारडा (वय १९)
-
अमन कबीर इनामदार (वय २०)
हे चौघेही मिनाताई ठाकरे वसाहत, इंदिरा नगर, पॉवर हाऊसच्या मागे, गुलटेकडी पुणे येथील रहिवासी आहेत.