Home Breaking News रायगडच्या विकासाला गती! विविध प्रकल्पांसाठी निधी, मंजुरी आणि तातडीने अंमलबजावणीचे आदेश

रायगडच्या विकासाला गती! विविध प्रकल्पांसाठी निधी, मंजुरी आणि तातडीने अंमलबजावणीचे आदेश

35
0

रायगड जिल्ह्यातील विकासकामांना वेग देण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विविध प्रकल्पांची सद्यस्थिती, येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजना याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. स्थानिक प्रशासनाला आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

जैवविविधता आणि वनउद्यानासाठी तातडीने निधी!

कोकणचे थोर सुपुत्र व अर्थतज्ञ डॉ. चिंतामणराव देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जामगाव येथे उभारण्यात येत असलेल्या जैवविविधता आणि वनउद्यानासाठी आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही. सध्या सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून, निसर्ग पर्यटनाचा प्रस्ताव शासनाकडे त्वरित पाठवावा. प्रस्तावाची तातडीने छाननी करून त्यास मान्यता दिली जाईल आणि आवश्यकतेनुसार टप्प्याटप्याने निधी उपलब्ध करून देण्याची हमी देण्यात आली.

पर्वतमाला योजनेत केदारजननी माता देवस्थान समाविष्ट होणार!

केंद्र सरकारच्या पर्वतमाला योजनेंतर्गत महाराष्ट्रातील ४५ स्थळांसाठी रोपवे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. यात तिसे येथील केदारजननी माता देवस्थानचाही समावेश करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. या प्रकल्पाला राज्य शासन मान्यता देऊन तो केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. वनविभागाने या प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या तातडीने मिळवून कार्यवाही गतीमान करण्याचा निर्णय घेण्यात आला.

भूस्खलनग्रस्त गावांचे तातडीने पुनर्वसन!

रोहा तालुक्यातील मौजे संभे गावाला भूस्खलन आणि दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन सुरक्षित पुनर्वसनाची कार्यवाही युद्धपातळीवर करावी, असे आदेश बैठकीत देण्यात आले. पुनर्वसन प्रक्रियेत कोणताही विलंब न होण्यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले गेले. राज्य शासनासाठी नागरिकांचा जीव वाचवणे सर्वात महत्त्वाचे आहे आणि या कामात कोणतीही हलगर्जीपणा खपवून घेतली जाणार नाही.

कृषी विद्यापीठाच्या विकासाला गती!

तळा तालुक्यात गिरणे येथे डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठासाठी आवश्यक जमीन अधिग्रहीत करताना सिडकोने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात येईल. विद्यापीठाला शेती संशोधन, विस्तार आणि खारभूमी संशोधन केंद्रासाठी लागणाऱ्या सुविधा तातडीने उपलब्ध करून दिल्या जातील. यासाठी लागणारा निधी सिडको आणि राज्य शासन मिळून देणार असून, विद्यापीठाने तातडीने वस्तुनिष्ठ प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश दिले.

पद्मदुर्ग किल्ल्यासाठी पर्यटन जेट्टीला मंजुरी लवकरच!

पद्मदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटन जेट्टी उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे विचाराधीन आहे. हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाच्या मंजुरीसाठी तातडीने पाठवावा आणि लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे आदेश दिले गेले.

मुरुड आणि दिवेआगरच्या पर्यटन विकासाला चालना!

मुरुड किल्ला आणि राजापूरी ग्रामपंचायतीच्या पर्यटन विकासाच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे केंद्र पुरस्कृत स्वदेश दर्शन योजनेतून मत्स्यालय आणि पर्यटक निवारा केंद्र उभारण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्याचे निर्देश देण्यात आले.

ही बैठक रायगड जिल्ह्यातील विकासाचा वेग वाढवण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरली असून, प्रशासकीय यंत्रणेला कार्यक्षमतेने प्रकल्प पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.