महिलांच्या हक्काचा रोजगार, सुरक्षित प्रवास आणि स्वयंपूर्णतेची वाटचाल – ‘पिंक ई-रिक्षा’ योजनेचे प्रेरणादायी उद्घाटन नागपूरमध्ये
नागपूर – “महिला सक्षमीकरणासाठी सरकारने घेतलेली ही कृतीशील दिशा म्हणजे केवळ योजना नव्हे, तर महिलांना स्वाभिमानाने जगण्याची संधी देणारा सामाजिक परिवर्तनाचा आरंभ आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे पिंक ई-रिक्षा योजनेच्या उद्घाटनप्रसंगी केले.
राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने आयोजित भव्य कार्यक्रमात ५० पात्र महिलांना पिंक ई-रिक्षा चे वाटप करण्यात आले. या योजनेद्वारे महिलांना ना केवळ रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे, तर महिलांनी महिलांसाठीच चालवलेल्या या ई-रिक्षामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह ठरणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी स्वतः महिला ई-रिक्षातून प्रवास करून दाखवली बांधिलकी!
या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः एक लाभार्थी महिला चालवत असलेल्या पिंक ई-रिक्षामधून प्रवास केला. हा एक सामाजिक संदेश देणारा ठोस निर्णय होता. “महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी शासन सदैव त्यांच्या पाठीशी आहे. आम्ही केवळ शब्दांमध्ये नाही, तर कृतीतून विश्वास देतो,” असे ते म्हणाले.
‘पिंक ई-रिक्षा’ योजनेचे प्रभावी अंमलबजावणीसाठी महामेट्रोबरोबर करार
नागपूर मेट्रो स्टेशन परिसरात प्रवाशांसाठी फिडर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने महामेट्रोबरोबर करार केला आहे. त्यामुळे महिला ई-रिक्षाचालकांना निश्चित उत्पन्नाची हमी मिळणार आहे. याच पद्धतीने राज्याच्या पर्यटन व इतर विभागांसोबत करार करून रोजगाराच्या संधी वाढविण्याचा शासनाचा मानस आहे.
‘पिंक ई-रिक्षा’ योजना : आठ जिल्ह्यांमध्ये महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार संदीप जोशी, डॉ. आशिष देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या योजनेअंतर्गत पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर, अमरावती, संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर या आठ जिल्ह्यांमध्ये गरजू महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य तसेच प्रशिक्षण दिले जाणार आहे.
योजनेची वैशिष्ट्ये :
-
प्रत्येक महिलेला मिळणार हक्काची ई-रिक्षा
-
महिला चालवतील, महिला प्रवास करतील – सुरक्षिततेची हमी
-
स्थिर उत्पन्नाचे साधन
-
प्रशिक्षण व चालवण्यासाठी सुलभ व्यवस्था
-
मेट्रो व टुरिझमसह संलग्न रोजगार संधी